कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या विविधतेने समृद्ध आहे. 
कोल्हापूर

कोल्हापूर : पर्यटनाच्या विविधतेने समृद्ध कोल्हापूर जिल्हा

ऐतिहासिक महत्त्व, राजर्षी शाहूंचा पुरोगामी वारसा, कला, क्रीडानगरी

पुढारी वृत्तसेवा
सागर यादव / तानाजी खोत

कोल्हापूर : निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेनेे नटलेला सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट, करवीर काशी म्हणून असणारे धार्मिक महत्त्व, दोन हजार वर्षांचा प्राचीन इतिहास, छत्रपतींची राजधानी म्हणून असणारे ऐतिहासिक महत्त्व, राजर्षी शाहूंच्या सामाजिक कार्याचा पुरोगामी वारसा, कला व क्रीडानगरी अशा विविधतेने नटलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची जगभर ओळख आहे. समुद्र आणि बर्फाच्छादित प्रदेश सोडला, तर या जिल्ह्यात सर्व काही आहे. यामुळे इथले पर्यटन उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंत बहरलेले असते. यामुळे बारमाही पर्यटनाचे डेस्टीनेशन असे कोल्हापूरला विशेष महत्त्व आहे. अशा या पर्यटननगरीचा मागोवा घेणारी लेखमालिका आजपासून...

अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे कोल्हापूर पर्यटनाच्या दुष्टीने पुरेपूर आहे. अल्हाददायक वातावरण, उन्हाळा-पावसाळा-हिवाळा असे तीन ऋतू, बारमाही निसर्गसंपन्न असणार्‍या कोल्हापूरला पर्यटन व्यापकतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अनेक बिरुदावल्यांनी कोल्हापूरची जगभर ओळख आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ वारसा कोल्हापूरला लाभला आहे. अशा विविधतेमुळेच कोल्हापूरची आधुनिक काळात ‘पर्यटननगरी’ अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. प्राचीन, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि भौगोलिक विविधतेने कोल्हापूरचे पर्यटन नटले आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि अधुनिक काळाबरोबरच या कालखंडातील विविध राजवटींच्या इतिहासाचा वारसा येथे पाहायला मिळतो. अनेक गुंफा, मंदिरे, मठ, वास्तू, गड-कोट-किल्ले, घाट, तलाव, धरणे, पठारे, जंगले यांची येथे श्रृंखलाच आहे.

निसर्गसंपन्न जिल्हा

निसर्गसंपन्न कोल्हापुरात अभयारण्ये, छोटी-मोठी जंगले, घाटवाटा, पठारे, डोंगर-दर्‍या, धरणे, नदी पात्रे, देवराया अशी विविधता आहे. यात राधानगरी व दाजीपूर अभयारण्य, आंबोली, अंबाघाट, गगनबावडा घाट, शिवडाव मार्ग यासह सह्याद्री व कोकण यांना जोडणारे सर्व घाट मार्ग, पठार यांचा समावेश आहे. याचबरोबर या परिसरात कोसळणारे विविध धबधबे हेही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

वस्तू संग्रहालयांची विविधता

प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाचा शेकडो वर्षांचा वारसा सामावलेल्या ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयांनी कोल्हापूरच्या पर्यटनात भर घातली आहे. टाऊन हॉलमधील कोल्हापूर वस्तू संग्रहालय, न्यू पॅलेसमधील छत्रपती शहाजी म्युझीयम, कसबा बावडा लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहू जन्मस्थळ व संग्रहालय, राजारामपूरी येथील चंद्रकांत मांडरे कला दालन व कणेरी मठ येथील ग्रामीण संस्कृति दर्शविणारे संग्रहालय या माध्यमातून कलानगरीचा वारसा जपला आहे.

प्राचीन गुंफा, शिल्पवैभव

कोल्हापूरच्या सभोवती असणार्‍या विविध धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अशा गुंफा, शिलालेख, शिल्पवैभव आणि तत्कालीन स्थापत्य पहायला मिळते. यात कुशीरे-पोहाळे येथील पांडव लेणी, मसाई पठार परिसरातील बौध्द लेणी, गगनबावडा परिसरातील प्राचीन गुहा, सातेरी, मोरजाई, तुंगजाई, रामलिंग, पळसंबे, सादळे-मादळे, पाटगाव यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांचा समावेश आहे.

पराक्रमाची साक्षीदार स्फूर्तीस्थळे

लढवय्या इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पहायला मिळतात. स्फूर्तीदायी इतिहासाची महती सांगणारे शेकडो वीरगळ, विविध कालखंडातील वीरांच्या समाध्या, स्त्रीशक्तीची साक्ष देणार्‍या सतीशिळा, शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारी पावनखिंड, पन्हाळगड व विशाळगडावरील स्मारके, गडहिंग्लज नेसरी खिंडीतील प्रतापराव गुजर व त्यांच्या शिलेदारांचे स्मारक, पन्हाळगडावरील रामचंद्र पंत अमात्य स्मारक, पंचगंगा नदी काठावरील छत्रपतींची स्मशानभूमि (संस्थान शिवसागर) अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची स्मारक कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. विविध कालखंडातील पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, शिवगड, गगनगड, मुढा गड, रांगणा, भुदरगड, सामानगड, पारगड, कलानिधीगड, महिपालगड, गंधर्व गड, कोट कोल्हापूर हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे.

सर्वधर्मीयांची श्रद्धास्थाने

करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी या देवस्थानांमुळे कोल्हापूरचे धार्मिक पर्यटन प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय प्राचीन काळापासून अस्तित्वात असणार्‍या अनेक मंदिरांमुळे इथल्या पर्यटनाचे महत्त्व कित्येक पटीने वाढले आहे. विविध धर्मिय मंदिर, मस्जीद, चर्चमुळे कोल्हापूरचे धार्मिक पर्यटन सजले आहे. खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, टेंबलाई मंदिर, नवदुर्गा, नृसिंहवाडी, आदमापूर, बाबुजमाल दर्गाह, विशाळगड दर्गाह, कसबा बीड परिसरातील विविध मंदिरे, ठिकठिकाणचे ऐतिहासिक चर्च यांचा यात समावेश आहे.

शाहूनगरीच्या पाऊलखुणा

शिवछत्रपती, रणरागिणी ताराराणी यांचा वारसा विकसित करण्याचे काम लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उद्देशाने त्यांनी रयतेचा सर्वांगीण विकास साधला. त्यांच्या कार्याची माहिती देणारी स्मारके जिल्हाभर विखुरली आहेत. यात शाहू जन्मस्थळ, समाधिस्थळ, शाहू मिल, राधानगरी धरण, सोनतळी, विविध जाती-धर्मियांची विद्यार्थी वसतिगृहे, कळंबा व रंकाळा तलाव, नवा व जुना राजवाडा, शालिनी पॅलेस यासह विविध शाहूकालीन ठिकाणांचा समावेश आहे.

कोल्हापूरला सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा वारसा लाभला आहे. याच्या पाऊलखुणा ठिकठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय पर्यावरण, जैवविविधता, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, कला-क्रीडा अशा विविधतेने समृद्ध असा हा जिल्हा आहे. यामुळे इथल्या पर्यटनाला विविध पैलू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT