कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur heavy rain | कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा; पंचगंगेची पातळी दोन फुटांनी वाढली

शिरोळसह 7 गावांत अतिवृष्टी; शहरात पंधरा तासांहून अधिक काळ संततधार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात तब्बल पंधरा तासांहून अधिक काळ धुवाँधार पावसाचा तडाखा बसला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संततधारेने रस्ते, नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धरण क्षेत्रांतही कोसळधारांनी जोर धरला आहे. शिरोळ तालुक्यासह हातकणंगले, शाहूवाडीतील 7 गावांत अतिवृष्टी झाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात दोन फुटांची वाढ होऊन रात्री 9 वाजता पातळी 15 फूट 3 इंचांवर होती. जिल्ह्याला रविवारी (दि. 28) देखील ‘ऑरेंज अलर्ट’ दिल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

शहरात शनिवारी पहाटे तीन वाजल्यापासून पावसाचा जोर सुरू झाला. हळूहळू मध्यम स्वरूपात कोसळणार्‍या सरींनी जोर पकडला. दुपारी अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाची संततधार सायंकाळपर्यंत होती. यामुळे नवरात्रौत्सवानिमित्त शहरात आलेल्या भाविकांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली होती. व्यापारी, फेरीवाले यांचेदेखील पावसामुळे हाल झाले. शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी सखल भागाला तळ्याचे स्वरूप आले होते.

‘या’ ठिकाणी झाली अतिवृष्टी

वडगाव (ता. हातकणंगले), शिरोळ, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर, शिरढोण (ता. शिरोळ), आंबा (ता. शाहूवाडी).

मुसळधार पावसाने शहरास झोडपले

परतीच्या मुसळधार पावसाने शनिवारी शहरास जोरदार झोडपले. यामुळे नवरात्रौत्सवातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला. नागरिकांसह पर्यटकांचे हाल झाले. डागडुजीसाठी रस्त्यावर टाकलेल्या मुरुमाचा चिखल झाल्याने नागरिकांची दैना उडाली. बहुतांश रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. शहरात शुक्रवारी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही काळ हलक्या सरी कोसळल्या. शनिवारी सकाळपासून शहरात सर्वदूर पाऊस झाला. शहरातील गजबजलेल्या बिंदू चौक, स्टेशन रोड, शाहूपुरी, मंगळवार पेठ, गंगावेस, लक्ष्मीपुरी, कावळा नाका, हॉकी स्टेडियम रोडजवळील विश्वपंढरी चौक परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. विशेषतः व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, बिंदू चौक परिसरात साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचार्‍यांचे हाल झाले. शहरातील काही व्यापारी भागात दुकानांपुढे पाणी साचल्याचे दिसून आले.

रेल्वे स्टेशन रोडसह शहरातील सर्वच भागांतील पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. अनेक ठिकाणी मोटारसायकली बंद पडून रहदारीला अडथळे निर्माण झाले. परीख पूल येथे पावसाने वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हॉकी स्टेडियमजवळील विश्वपंढरीजवळ नेहमीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढून जावी लागली. शहराच्या उपनगरातील लक्षतीर्थ, फुलेवाडी, शिवाजी विद्यापीठ, पाचगाव, कळंबा परिसरात पावसाचा जोर जाणवला. संततधार सरींमुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी पाचनंतर पावसाने थोडी उघडीप दिल्याचे पाहायला मिळाले; परंतु वातावरण ढगाळ राहिले.

ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

शहरातील बहुतांश रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. यामुळे रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी होते. दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढून जाताना वाहनधारकांची पुरती कसरत झाली. ड्रेनेज चेंबर्स झाकणाचे उंचवटे झाल्याने अनेक दुचाकीस्वार पडल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT