Kolhapur Rain 
कोल्हापूर

Kolhapur Rain : जिल्ह्याला अवकाळीने झोडपले

गारपिटीमुळे फळपिकांना फटका; जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. हा पाऊस काही पिकांना लाभदायक, तर काही पिकांना मारक ठरणार असून गारपिटीमुळे फळपिकांना याचा फटका बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

गांधीनगर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांना फटका

गांधीनगर बाजारपेठेसह परिसरास गारांसह झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला व ईदच्या खरेदीसाठी आलेल्या ग््रााहकांना पावसाचा फटका बसला. सायंकाळी सातच्या दरम्यान पावसास प्रारंभ झाला.

शिरोली एमआयडीसी परिसरात तासभर पावसाचे ‌‘तांडव‌’

नागाव : शिरोली औद्योगिक वसाहतीसह परिसरात बुधवारी सायंकाळी निसर्गाचा रौद्र अवतार पाहायला मिळाला. शिरोली एमआयडीसी आणि परिसरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. मार्च महिन्यातील या अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांची धांदल उडाली.

पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, काही वेळातच परिसरात ‌‘टपोऱ्या‌’ गारांचा खच पडला. रस्त्यांवर पांढरी शुभ चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिरोली वसाहतीतील कामगारांच्या ऐन सुट्टीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची आणि वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली. जोरदार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन संथ गतीने सुरू होती.

औद्योगिक क्षेत्राला फटका

पुलाची शिरोली : एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांच्या परिसरात या पावसाने पाणी साचल्याने कामावर परिणाम झाला. तसेच, गारांच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी पत्राशेडचे नुकसान झाले. कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना या पावसाने तात्पुरता दिलासा दिला असला, तरी शेती आणि फळबागांसाठी हा पाऊस ‌‘आस्मानी संकट‌’ ठरला आहे.

बानगे परिसरात वाऱ्यासह पाऊस

बानगे : बानगे परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिसरात सोनगे, बानगे गावात गारांचा पाऊस झाला. हा पाऊस ऊस पिकाला पोषक झाला असला, तरी परिसरात अंतिम टप्प्यात कापणीस आलेल्या शाळू पिकाचे नुकसान झाले आहे.

शेळोली परिसरात फळपिकांचे नुकसान

कडगाव : भुदरगड तालुक्यातील शेळोली परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. गारांसह झालेल्या पावसामुळे परिसरातील काजू, आंबा, जांभूळ, करवंदी आदी फळ पिकांचे मोठे नुकसान झाले.

कासारवाडी परिसरात गारांसह पाऊस

कासारवाडी : येथील परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांसह वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे एक तासाच्या अवकाळी पावसामुळे पिके आडवी झाली असून गारांच्या तडाख्यामुळे भाजीपाला व रब्बी पिकांचे नुकसान झाले. बुधवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह काळे ढग दाटून आले. त्यानंतर गारांचा मारा सुरू झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच भाजीपाला पिके मोठ्या मेहनतीने उभी केली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे ही पिके जमिनीवर कोसळली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT