कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन पालकमंत्री नेमण्यात आले आहेत. शिंदे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर पालकमंत्री, तर भाजपच्या माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री म्हणून आता जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत. राष्ट्रवादीला पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची हसन मुश्रीफ यांची संधी हुकली आहे. मुश्रीफ यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे.
पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे शिवसेना यांच्यामध्ये कमालीची चुरस होती. विसर्जित सरकारमध्ये पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. पुन्हा त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार, अशी चर्चा होती. एका कार्यक्रमासाठी जाताना पालकमंत्री म्हणून स्वागत करायला जायचे आहे, असा चुकून उल्लेख मुश्रीफ यांच्याकडून झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रिपद मुश्रीफ यांच्याकडे येणार, अशी चर्चा होती. मात्र, कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत धक्कादायक निर्णय देत दोन पालकमंत्री नेमण्यात आले. भाजपला कोल्हापूरच्या कारभारात वर्चस्व राखण्यासाठी सहपालकमंत्रिपद देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याच्या निकषावर प्रकाश आबिटकर यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आबिटकर हे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे सहपालकमंत्रिपद सोपविल्याची चर्चा आहेत.
कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह नगरपालिका, पंचायत समिती निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यावेळी नेमकी जिल्ह्याची सूत्रे शिंदे शिवसेना व भाजपकडे असतील. राष्ट्रवादी मात्र यापासून दूर आहे. अर्थात, राष्ट्रवादीचे एकच आमदार निवडून आल्यामुळे संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री, सहपालकमंत्रिपदाचा निर्णय घेतला गेला असावा, अशी चर्चा आहे.
हसन मुश्रीफ हे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व ठेवून आहेत. ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडविण्यात आणि जिल्हा बँकेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे. यासाठी त्यांनी सतेज पाटील, विनय कोरे आदींचे सहकार्य घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी मुश्रीफ यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्याची फिल्डिंग कोणाची? याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.