कोल्हापूर

अतिक्रमणांच्या आक्रमणांनी कोल्हापूर ‘जायबंदी’!

दिनेश चोरगे

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील हजारो अतिक्रमणांनी या शहराला पुरते जायबंदी करून टाकले आहे. महापालिकेकडे शहरातील दोन हजारांहून अधिक अतिक्रमणांच्या नोंदी आहेत. अधिकार्‍यांनी 'अर्थपूर्ण कानाडोळा' केलेली अतिक्रमणेही काही हजारांच्या घरात आहेत. याशिवाय शहरातील रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणांची तर गणतीच नाही. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी म्हणून महापालिकेने त्या त्या रस्त्यांलगत असलेल्या हजारो खासगी मिळकती भूसंपादनाच्या माध्यमातून ताब्यात घेतल्या होत्या. संबंधित मालमत्ताधारकांना त्यांच्या जागांची रितसर भरपाई देण्यात आलेली होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी बहुतांश रस्त्यांच्या रुंदीकरणाची प्रक्रिया प्रलंबित आहे.

दरम्यानच्या काळात महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या काही मूळ जागामालकांनी आपल्या जागा अद्याप मोकळ्याच केल्या नाहीत. उलट काही मालमत्ताधारकांनी महापालिकेकडून जागेची नुकसान भरपाई मिळवूनदेखील पुन्हा त्या जागांवर नव्याने बांधकामे केलेली आहेत. अशा मालमत्तांना महापालिकेच्या कारभार्‍यांचे आणि अधिकार्‍यांचे 'अर्थपूर्ण अभय' मिळत असल्याने वर्षानुवर्षे ही अतिक्रमणे ठाण मांडून आहेत. महापालिकेच्या मालकीच्या किंवा खुल्या जागेवरील अतिक्रमणांची संख्याही शेकडोंनी आहे. या अतिक्रमणांना महापालिकेच्या काही कारभार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी आपली 'चराऊ कुरणे' बनवून टाकली आहेत. अशा अतिक्रमणांना नोटिसा बजावायच्या आणि कारवाईच्या नावाखाली 'सेटलमेंट' करण्याचा उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीही अतिक्रमणे हटविणे आजपर्यंत महापालिकेला शक्य झालेले नाही. ही अतिक्रमणे कोल्हापूर शहराच्या विकासाला फार मोठा ब्रेक लावताना दिसत आहेत.

महापालिका क्षेत्रात 5 हजारांहून अधिक हातगाडीवाले आणि फेरीवाले आहेत. यापैकी अनेकांकडे कोणताही परवाना नाही. वास्तविक पाहता ज्यांच्याकडे महापालिकेचे परवाने आहेत, अशा या व्यवसायिकांनी फिरत्या स्वरूपात आपला व्यवसाय करायचा आहे; पण शहरातील बहुतांश हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांनी जिथे मोकळी जागा मिळेल तिथे गाडे थाटले आहेत. या हातगाडीवाल्यांच्या आणि फेरीवाल्यांच्या कचाट्यातून शहरातील एकही फुटपाथ सुटलेला नाही. हातगाडीवाल्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून फुटपाथचा वापर आपल्या व्यवसायासाठी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पादचार्‍यांना चालण्यासाठी शहरात कुठे फुटपाथच अस्तित्वात राहिलेले दिसत नाहीत. महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने जे अतिक्रमणांचे झाले आहे, तसेच हातगाड्यांनीही बाळसे धरले आहे.

प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण अत्यावश्यक

कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा भार गेल्या काही वर्षांत जवळपास दसपटीने वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते आहे तेवढेच आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी ही कोल्हापूरच्या जणूकाही पाचवीलाच पुजली आहे. कोल्हापुरातील काही प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिकांचा विरोध, तर काही ठिकाणी न्यायालयीन हस्तक्षेपामुळे रस्ते रुंदीकरणाची कामे रखडलेली आहेत. मात्र, वाढती वाहतूक विचारात घेता शहरातील काही प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. आज केवळ रस्त्यांच्या सोयी-सुविधांअभावी अनेक संधी कोल्हापूरच्या हातातून सुटताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT