MPSC Pudhari
कोल्हापूर

MPSC Exam : ‘एमपीएससी’साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी

२५ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी विक्रमी विद्यार्थी संख्या

पुढारी वृत्तसेवा

अनिल देशमुख

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २५ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या ‘गट क’ संयुक्त सेवा परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात यंदा विक्रमी संख्या आहे, त्यातच गेल्या काही दिवसांपासूनच्या आयोगाबाबत विद्यार्थ्यांत निर्माण झालेल्या वातावरणामुळे अधिक दक्षता घेतली जात आहे.

‘एमपीएसी’कडून ५ हजार ७०७ पदांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे, त्याकरीता तब्बल ११ लाख ५० हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात यापैकी ५६ हजार ७१८ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच नोकरीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनानेही आतापासूनच परीक्षेचे काम सुरू केले आहे.

शहराबाहेरही असतील केंद्रे

या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्याच अधिक असल्याने यावेळी एमपीएसीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर शहराबाहेरही केंद्रे राहणार आहेत. त्यानुसार केंद्र निश्चित करणे आणि त्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरासह शिरोळ, हातकणंगले, कागल, पन्हाळा तालुक्यातील महत्वाच्या शहरात, शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांत ही केंद्रे असणार आहे.

प्रस्तावित केंद्रांची पडताळणी

परीक्षेसाठी निश्चित केल्या जाणाऱ्या केंद्रांची पडताळणी सुरू आहे. प्रकाश व्यवस्था, खोल्यांची स्थिती, बैठक व्यवस्था, इमारतीची सुरक्षितता, सरंक्षक भिंत, परिसरासाठी एकच प्रवेशद्वार आदींसह कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार होणार नाही, यासह सर्व पायाभूत सुविधा यांची तपासणी केली जात आहे. याकरीता नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची पथके स्थापन केली आहेत.

आतापर्यंतची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी याबाबत आतापर्यंत दोन बैठका घेतल्या आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन यामध्ये समाविष्ठ केले आहे. सर्व पातळीवर सर्व प्रकारची दक्षता घेत, या परीक्षेचे नियोजन केले जात आहे.
- गजानन गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT