थेट पाईपलाईनची गळती रोखण्याचे आव्हान! 
कोल्हापूर

कोल्हापूर : थेट पाईपलाईनची गळती रोखण्याचे आव्हान!

काळम्मावाडी धरणापासून काही अंतरावरील गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

पुढारी वृत्तसेवा

काळम्मावाडी : थेट पाईपलाईनबाबत बेशिस्तपणाचा कळस म्हणावा लागेल, असा प्रकार आज उघडकीस आला आहे. काळम्मावाडी धरणापासून काही अंतरावर थेट पाईप लाईनला गळती लागली आहे. झाडाझुडपातून हे पाणी गेले दीड वर्षे शेजारच्या ओढ्यातून वाहत जात आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. या पाईपलाईनवर काम करणारे कंपनीचे आणि महानगरपालिकेचे अधिकारी करतात तरी काय? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन या बहुचर्चित योजनेचे काम गेले दहा वर्षे सुरू होते. 2023 ला या योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा शहरासाठी सुरू झाला. मात्र, पाणी सुरू झाले त्या दिवसापासून गेले दीड वर्षे काळम्मावाडी धरणाच्या हाकेच्या अंतरावर ही पाईपलाईनला गळती सुरू आहे. आतापर्यंत कोटी लिटर पाणी शेजारील ओढ्यातून वाया जात आहे. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षपणाबद्दल धरण क्षेत्रातील नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, बेशिस्तपणाच्या गलथान कारभाराचा कळस म्हणावा लागेल. एका बाजूला उन्हाने नागरिकांच्या अंगाची लाही होत असतानाच शहरवासीयांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर दुसरीकडे शुद्ध धरणातील पाणी वाया जात आहे. तरी सर्वच पाईपलाईन मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, यासंबंधी प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला कोठेही गळती लागलेली नसून तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यावरून या कंपनीचे किंवा महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांचे किती लक्ष असेल, हे दिसून येते.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

घाई गडबडीत या योजनेचे काम करण्यात आले. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांत या योजनेला अडथळा निर्माण झाला. त्या अडथळ्यांच्या शर्यती पूर्ण करत 2023 ला ही योजना कार्यान्वित झाली. तशी तालुक्यातील अनेक गावांत या योजनेच्या पाईपला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जाण्याबरोबरच शेतकर्‍यांच्या जमिनी वाहून गेल्या. शहराचा पाणीपुरवठा सातत्याने बंद ठेवावा लागला. एप्रिल, मे महिन्यांच्या उन्हात अनेक गावांमध्ये पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. शहरातसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर धरणातील शुद्ध पाणी गेले दीड वर्षे वाया जाते याबद्दल कोणत्याच अधिकार्‍याचे लक्ष नसावे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT