विशाळगड : सुभाष पाटील : शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला, छत्रपतींच्या स्वराज्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेला किल्ले विशाळगड येथील पंतप्रतिनिधी वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. वाड्याभोवती वाढलेली काटेरी झुडपे, ढासळलेल्या भिंती त्यामुळे वाड्याची दुरवस्था झाली आहे. पुरातन खात्याने विशाळगडाच्या तटबंदी व बुरुजासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. परंतु निधीअभावी अर्धवट राहिलेल्या या वाड्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी या वाड्याला नवे रुपडे देण्याचा प्रयत्न झाला. मात्र अर्धवट काम झाल्याने वाड्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
विशाळगडाच्या वैभवाची साक्ष असणारा हा पंतप्रतिनिधी वाडा १७०१ दरम्यान गडाच्या पूर्व दिशेला रामचंद्र अमात्य पंत यांनी बांधला. या वाड्यात शिवकालीन सभा, खलबते, न्याय-निवाडा केला जायचा. मात्र सध्या या वाड्याची दुरवस्था झाली आहे. तरी संबंधित विभागाने या इतिहासाचा वारसा असणाऱ्या अनमोल ठेव्याला निधी उपलब्ध करुन द्यावा आणि वाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावा. वाड्याशेजारी एक चौकोनी विहीर आहे. आजही ही विहीर गडवासीयांची जलस्रोत असून जीवनदायिनी आहे. मात्र, या विहिरीची आणि प्रवेशद्वाराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास सांगणारा किल्ले विशाळगड कात टाकत असला तरी अर्धवट कामामुळे गडावरील वास्तूंच्या पाऊलखुणा पुसल्या जात आहे. सात-आठ वर्षांपूर्वी मुंढा दरवाजा आणि पंतप्रतिनिधी वाड्याच्या डागडुजीचे काम पुरातत्व विभागाने हाती घेतले होते. यासाठी ५७ लाखांचा निधीही उपलब्ध झाला आणि त्यात वाढही करण्यात आली होती. निधीतून मुंढा दरवाजाचे काम पूर्ण झाले, तर वाडा अर्धवट अवस्थेत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम ऐक्य असणाऱ्या विशाळगडावर महादेव मंदिर, गणेश मंदिर, राम मंदिर, मारुती मंदिर, नृसिंह मंदिर तसेच मलिक रेहान दर्गाही आहे. सर्वधर्मीय पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. संबंधित विभागाने गडाच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करून उर्वरित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रायगड किल्याच्या संवर्धनाच्या निधीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आणि तो मंजूरही झाला होता. त्याच धर्तीवर विशाळगडासह सर्व किल्यांच्या संवर्धनासाठी निधी मंजूर व्हावा, अशी पर्यटकांतून मागणी होत आहे.
निधी उपलब्ध नसल्याने वाड्याची कामे अर्धवट राहिली आहेत. निधी उपलब्ध होताच उर्वरित कामे पूर्ण केली जातील. गडावरील अतिक्रमणे काढूनच 'सुंदर विशाळगड' योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे.
– विलास वाहणे, सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे
हेही वाचा