कोल्हापूर : उपनगर परिसरातील देवकर पाणंद चौक येथे मुख्य रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा पडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून खड्डा तसाच असून खड्ड्याकडे महापालिका, नगरसेवक यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यामुळे एखाद्या वाहनधारकाचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.
शहरातील देवकर पाणंद परिसर एक प्रमुख उपनगर आहे. संभाजीनगर बसस्थानकाकडून क्रशर चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर देवकर पाणंद चौक येथे दोन भले मोठे खड्डे पडले आहेत. तसेच चौकातून देवकर पाणंद पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. परिसरात दाट नागरी वस्ती असून पुढे साने गुरुजी वसाहत रंकाळा, राधानगरी रोडला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे या मार्गावर नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची ही वर्दळ असते. येथील खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने खड्डा बुजवण्याची मागणी होत आहे.