बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे-कोकरूड मार्गावरील वडगांव येथे ट्रॅव्हल्स बसच्या चाकाखाली चिरडून सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विजय तुकाराम फडतारे (वय ५७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
खासगी ट्रॅव्हल्स बस (एम एच ०५, ए झेड ८१२१) ही प्रवासी घेऊन मुंबईला निघाली होती. यावेळी विजय फडतारे हे दुचाकीवरुन निघालेले होते. यावेळी कुत्रे आडवे आल्याने ताबा सुटून संबंधित फडतारे हे ट्रॅव्हल्सच्या मागील चाकाखाली पडल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान चाक डोक्यावरून गेल्याने फडतारे यांचा क्षणात मृत्यू झाला.
सुपात्रे येथील मृताच्या नातेवाईकांना तसेच शाहूवाडी पोलिसांना स्थानिक पोलीस पाटील यांनी अपघाताची वर्दी दिली आहे. एपीएस अमित पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली. मयत विजय फडतारे गोकुळ दूध संघात सेवेत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.