माद्याळ; पुढारी वृत्तसेवा : सध्या सर्वत्र वाढत्या तापमानामुळे नागरिकांना अनेक आजाराना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना पहायला मिळत आहेत. कोल्हापूरातही मंगळवारी अशीच एक घटना घडली. कागल येथील कासार गावातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कासारी (ता.कागल) येथील शेतकरी तानाजी भाऊसो शिंदे (वय ५६) यांचा मंगळवारी (दि. ३१) उष्माघाताने मृत्यू झाला. ते कामानिमित्त कापशी येथे गेले होते. काम उरकून घराकडे परतत असताना त्यांना बाजारपेठेत उष्माघाताचा झटका आला. कापशी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना हद्यविकाराचा त्रास आणखी जाणवू लागला. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना निपाणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उष्णाघाताच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
शिंदे हे भाजीपाला विक्री व्यवसाय देखील करत होते. त्यामुळे ते नेहमी कापशी-कासारी या मार्गावर ये-जा करीत असायचे. मंगळवारी देखील ते कामासाठी आले होते. उन्हाच्या तीव्र झळा बसत असतानाही त्यांनी भाजीपाला खरेदीसाठी फेरफटका मारला. तापमानाची तीव्रता शरीराला पेलवली नाही. यात शिंदे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. गरीब व कष्टाळू शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकीक होता.