कोल्हापूर

कोल्हापूर : वाळू तस्करांचे शेकडो अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ले

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वाळू तस्करीतील भरमसाट पैसा आणि राजकीय पाठबळामुळे राज्यातील वाळू तस्कर अक्षरश: बेफाम झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून या माफियांनी दशकभरात शेकडो शासकीय अधिकार्‍यांवर आणि कर्मचार्‍यांवर प्राणघातक हल्ले केले आहेत.

राज्याच्या बहुतांश भागातील वाळू तस्कर हे त्या त्या भागातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. काही ठिकाणी तर त्या त्या भागातील राजकीय नेतेच वाळू तस्करीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून बहुतांश वाळू तस्करांना राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून पाठबळ मिळताना दिसते.गत् आठवड्यात समुद्राची वाळू चोरणार्‍यांनी रत्नागिरीत एका महिला उपजिल्हाधिकार्‍यांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पण, अशा शेकडो घटना गेल्या दहा वर्षांत घडलेल्या आहेत. 2022 साली नांदेडमध्ये काही वाळू तस्करांनी चार शासकीय कर्मचार्‍यांवर तलवारीने हल्ला केला होता. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांत शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी तर शासकीय कार्यालयात घुसून अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. शासकीय अधिकार्‍यांवर वाळू तस्करांनी हल्ला केला की पोलिस आणि प्रशासन खडबडून जागे होते आणि काही दिवस अटकसत्र आणि धाडसत्र सुरू राहते.

मात्र, प्रशासनाची ही जागरूकता तेवढ्या चार-आठ दिवसांपुरतीच राहते. राज्यातील या वाळू तस्करांना जसे पैशाचे व राजकारण्यांचे पाठबळ आहे, तसेच प्रशासनातीलच काही झारीतील शुक्राचार्यांचीही चोरीछुपे मदत होताना दिसते. नदीकाठच्या गावातील काही महसूल आणि पोलिस कर्मचारी चिरीमिरीच्या बदल्यात वाळू तस्करांच्या कारवायांकडे कानाडोळा करताना दिसतात. त्याचाच परिणाम म्हणून वाळू माफिया मुजोर झालेले दिसतात.

वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रमुख घटना

  • अंबडच्या तहसीलदारांना मारहाण
  • हिंगोलीच्या प्रांताधिकार्‍यांवर हल्ला
  • नाशिक जिल्ह्यात दोन तहसीलदारांना कार्यालयात घुसून मारहाण
  • एरंडोलच्या प्रांताधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
  • जालन्यात पोलिस अधिकार्‍याचे दोन्ही पाय मोडले
  • जळगावच्या उपजिल्हाधिकार्‍यांवर जीवघेणा हल्ला
  • आजवर शेकडो तलाठ्यांना मारहाण
  • अनेक पत्रकारांवर प्राणघातक हल्ले

गुंडांच्या फौजा!

काही वाळू माफियांनी कारनामे चालू ठेवण्यासाठी आणि शासकीय कर्मचार्‍यांवर दहशत बसविण्यासाठी पदरी गुंडांच्या फौजाच पाळलेल्या दिसत आहेत. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

SCROLL FOR NEXT