सिद्धनेर्ली: पिंपळगाव खुर्द ता: कागल येथील पाझर तलाव्यामध्ये चार ते पाच फूट लांबीची मगर मृत अवस्थेत आढळून आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कागल येथील वनधिकारी यांनी घटनास्थळी येऊन मृत मगर ताब्यात घेतली.
अधिक माहिती अशी, कागल मुरगुड रोडच्या शेजारी पिपळगाव खुर्द येथील पाझर तलाव आहे. या तलावात चार ते पाच दिवसांपूर्वी ही मगर मृत झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तलावामध्ये मासे पकडण्यासाठी आलेल्या मुलांना ही मगर दिसल्यावर त्यांनी शेजारी असणाऱ्या लोकांना सांगितले. त्यानंतर ग्रामपंचायतीने सदर घटनेची कल्पना वन अधिकारी यांना दिली. घटनास्थळी वनअधिकारी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करून मगरीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी करवीर वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल शैलेश शेवडे, वनरक्षक ओंकार भोसले, वनसेवक बाबसो जगदाळे, गजानन मगदूम आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मगर ताब्यात घेतली.
या पाझर तलावामध्ये कालव्याचे पाणी येत असल्यामुळे या पाण्याच्या माध्यमातून ही मगर तलावामध्ये आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी वन अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशाराही गावातील नागरिकांना, आसपासच्या शेतकऱ्यांना दिला आहे. आणखी देखील मगरीचे वास्तव्य या तलावात असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यावेळी वनाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतिलाही सूचना केली आहे. सदर मगरीचा मृत्यू नेमका कशाने झाला. मृत्यु मागे काय कारण आहे याची माहिती लवकरच शोधून काढली जाईल असे वनाधिकाऱ्यांच्या मार्फत सांगण्यात आले.