कुरुंदवाड : शहरातील स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे मोकाट कुत्र्यांकडून लचके तोडले जाण्याच्या माणुसकीला काळिमा फासणार्या अमानुष प्रकाराची ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने अखेर पालिकेच्या ढिम्म प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने तातडीने स्मशानभूमी बंदिस्त करण्याच्या कामाला सुरुवात केली असून, दहन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्मचारी नियुक्ती आणि मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
कुरुंदवाड शहरातील स्मशानभूमीला संरक्षण भिंत नसल्याने आणि दहन प्रक्रियेवर देखरेख ठेवणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला होता. अनेकदा अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहिलेले मृतदेह ही कुत्री सरणावरून ओढून नेत त्यांची विटंबना करत होती. हा धक्कादायक प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. ‘पुढारी’ने या गंभीर समस्येवर प्रकाश टाकत प्रशासनाचे लक्ष वेधले. या वृत्तानंतर तातडीने हालचाल करत पालिका प्रशासनाने स्मशानभूमी बंदिस्त करण्यासाठी ठेकेदाराला आदेश दिले आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी जागेची पाहणी केली असून, येत्या दोन दिवसांत हे काम पूर्णत्वास जाईल, असे सांगण्यात आले.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दहन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कर्मचारी नियुक्त करणे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि मृतदेह पूर्णपणे दहन झाल्याची खात्री करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
स्मशानभूमी बंदिस्त करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तत्काळ काम सुरू करण्याचे पत्र दिले आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करून प्राणी आत येणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील.- श्रद्धा वळवडे, कार्यालय अधीक्षक, नगरपालिका
‘पुढारी’च्या बातमीने मृत व्यक्तींच्या सन्मानाच्या लढ्याला आधार दिला आहे. प्रशासनाला जागे करण्याबरोबरच या बातमीने मृतात्म्यांच्या सन्मानाचा आवाज बुलंद केला आहे.- सचिन मोहिते, नागरिक