कोल्हापूर : मान्सून काळात उद्भवणाऱ्या आव्हांनांना तोंड देण्यासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी आराखडे केले जातात, ते फक्त कागदावरच नकोत, त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करा, कार्यवाही कशी करता ते आपण स्वत: पाहणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व यंत्रणांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली.
ग््राामीण व शहरी भागांतील स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना कोणत्या निवारागृहात जायचे आहे, याची पूर्वकल्पना देऊन मार्गदर्शक सूचना द्या, असे सांगत डॉ. राठोड म्हणाले, संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांसाठी निश्चित केलेल्या निवारागृहांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्नागृहांच्या सुविधा सज्ज ठेवा. ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा वेळेत नियोजन करा.
मे पर्यंत नाले सफाई करा; तसे प्रमाणपत्र द्या
महापालिका, नगरपालिकांनी मे अखेरपर्यंत नाले सफाईची कामे पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले. नाले सफाई पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रशासनाला देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
धरणांची तांत्रिक तपासणी करा
जिल्ह्यातील 7 मोठ्या धरणांची तांत्रिक तपासणी करा, असे आदेश देत डॉ. राठोड म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनात उपयोगात येणाऱ्या सर्व साहित्याची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करा. आरोग्य विभागाने वैद्यकीय नियोजन करावे, पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या चाऱ्यासह निवारा केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवावी. महावितरणने विद्युत यंत्रणेतील धोके दूर करावेत.
बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समन्वयक प्रसाद संकपाळ यांच्यासह सर्व आस्थापनांचे विभागप्रमुख उपस्थित होते.