कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणांत गतवर्षीच्या तुलनेत जुलैच्या मध्यापर्यंत 24.96 टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. प्रमुख 17 धरणांपैकी आठ धरणे पूर्णपणे तर उर्वरित धरणे सरासरी 85 टक्के भरली आहेत. यामुळे पावसाचा जोर वाढला तर या महिन्याअखेरपर्यंत बहुतांशी सर्वच धरणे भरतील अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढ झाली. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ दुपटीने झाली. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंतच धरणात झालेला पाणीसाठा चिंताही वाढवणारा आहे. पावसाचा जोर वाढला आणि सर्वच धरणे भरली तर जुलैअखेर आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत महापुराचाही धोका आहे. जिल्ह्यातील प्रमुख 17 धरणांत पूर्ण क्षमतेने 93.72 टीएमसी पाणीसाठा केला जातो. यावर्षी 15 जुलैपर्यंत तो 76.07 टीएमसी इतका झाला आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत तो 51.11 टीएमसी इतका झाला होता. धरणात गतवर्षी पाणीसाठा कमी असूनही पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी धोक्यापर्यंत गेली होती.
धरणात वेगाने वाढलेल्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर चिकोत्रा वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग नियमित सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रथमच 3100 क्युसेक विसर्ग गेल्या महिनाभरापासून कायम ठेवला आहे. तरीही राधानगरी धरण 85 टक्के भरले आहे. वारणा धरणातून सध्या 4500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तो आणखी वाढवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 17 पैकी आठ धरणे पूर्ण भरली आहेत. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे, धामणी, आंबेओहळ या धरणांत यावर्षी करण्यात येणार्या प्रकल्पीय पूर्ण संचय साठ्याप्रमाणे पूर्ण पाणीसाठा झाला असून या धरणाच्या सांडव्यातून तसेच वीज निर्मितीसाठीही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.