कोल्हापूर : मे महिनाभर पुरेल इतके पाणी जिल्ह्यातील धरणात आहे. प्रमुख आठ धरणे एप्रिलअखेर निम्मी भरलेली आहेत. यात सरासरी 49.55 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात 3.04 टीएमसी जादा पाणी आहे.
गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. धरणातील साठा चांगला झाला. यावर्षी वळीवही चांगला होत आहे. यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात यावर्षी 3.04 टीएमसी जादा पाणी आहे. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने चांगले राहिले. मे महिन्यातही दमदार आणि सर्वदूर वळीव झाला तर धरणातील साठा जूनपर्यंत चांगला राहील, अशी शक्यता आहे. जूनपर्यंत पाणीसाठा 35 ते 40 टक्क्यापर्यंत राहिला.
कोल्हापूसाठी वरदायी असणारे राधानगरी धरण एप्रिल अखेर 47 टक्के भरले. धरणात सध्या 3.72 टीएमसी साठा आहे. गतवर्षीच्या या दिवसाच्या तुलनेत तो 1.17 टीएमसी जादा आहे. धरणात गतवर्षी 30 एप्रिलअखेर 2.55 टीएमसी साठा होता.
वारणा धरणातही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 1.89 टीएमसी जादा पाणी आहे. धरणात सध्या 9.74 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी 30 एप्रिलअखेर 7.85 टीएमसी पाणीसाठा होता.