धीरज बरगे
कोल्हापूर : दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पाच वर्षांत 1,200 दूध संस्था वाढल्या आहेत. सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाकडे 2021-22 मध्ये 5,026 संस्थांची नोंद होती. मार्च 2025 मध्ये नोंदणीकृत संस्थांची संख्या 6,238 झाली. वाढलेल्यांपैकी बहुतांश संस्था ‘गोकुळ’शी संलग्न आहेत. ‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीवपैकी केवळ नोंदणी असणार्या संस्था किती? आणि प्रत्यक्षात दूधपुरवठा करणार्या संस्था किती? हा मुद्दा चर्चेत येणार आहे.
‘गोकुळ’च्या मे 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात नव्याने दूध संस्थांची नोंदणी वाढू लागली. वाढलेल्या संख्येवरून ‘गोकुळ’मधील सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले. संस्था वाढल्या त्या तुलनेत दूध संकलन का वाढले नाही, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला गेला; पण गेल्या पाच वर्षांत दूध संस्थांची संख्या वाढतच गेली.
‘गोकुळ’ निवडणुकीत पाच तालुक्यांना महत्त्व
‘गोकुळ’च्या निवडणुकीत करवीर, कागल, पन्हाळा, भुदरगड आणि राधानगरी या पाच तालुक्यांना महत्त्व असणार आहे. या तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत दूध संस्थांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे तालुके निर्णायक असणार असून, नेत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
मे 2023 पर्यंतच्या संस्था मतदानास पात्र
पाच वर्षांत 1,200 दूध संस्थांची नव्याने नोंदणी झाली असली, तरी मे 2023 पर्यंत नोंदणी झालेल्या संस्था मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. त्यानुसार सुमारे दोनशे संस्थांची नोंदणी मे 2023 नंतर झाली. तर, मागील वर्षात 75 संस्थांची नोंदणी रद्द झाली. 164 संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे.