हल्ल्यात मगरीने मच्छीमाराचा पाय जबड्यात पकडला Pudhari
कोल्हापूर

Crocodile Attack Kolhapur | वारणा नदीत मासेमारी करताना मगरीचा हल्ला; मच्छीमाराचा जीव थोडक्यात बचावला

कुंभोज–माळवाडी दरम्यान वारणा नदीवरील पुलाखाली थरार

पुढारी वृत्तसेवा

Kumbhoj Fisherman Attacked by Crocodile

कुंभोज : वारणा नदीच्या पात्रात मासेमारी करत असताना मच्छीमारावर मगरीने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना शनिवारी (दि.१४) दुपारी घडली. या हल्ल्यात मगरीने मच्छीमाराचा पाय जबड्यात पकडला; मात्र प्रसंगावधान राखत झटका देऊन पाय सोडविल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेत मच्छीमाराच्या पायाला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंभोज–माळवाडी दरम्यान वारणा नदीवरील पुलाखाली शनिवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास युनूस तांबोळी हे मासेमारीसाठी नदीपात्रात गेले होते. त्यांनी टाकलेले जाळे काढण्यासाठी ते पाण्यात उतरले असताना अचानक एका मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या पायाला जबड्यात पकडले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे क्षणभर गोंधळ उडाला; मात्र तांबोळी यांनी धैर्य आणि प्रसंगावधान राखत जोराचा झटका देऊन पाय मगरीच्या तावडीतून सोडवून घेतला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

जखमी युनूस तांबोळी यांना उपचारासाठी हातकणंगले येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला करणारी मगर सुमारे सहा फूट लांबीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कुंभोजसह वारणा नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नदीपात्रात जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT