Crime News pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur Crime : कॅसिनोत जिंकलेल्या पैशातील वाट्यासाठी तरुणास विवस्त्र करून मारहाण

चौघांवर गुन्हा, अपहरण करून ९० हजार उकळले; विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओही केला व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोव्यातील कॅसिनोत जिंकलेल्या पैशातून एक लाखांची मागणी करून तरुणाकडून ९० हजार रुपये उकळणाऱ्या चौघांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद आकाश चंद्रकांत मुळे (३६, रा. शिवाजी पूल परिसर) याने दिली. पैशासाठी विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोपही मुळे याने केला. याप्रकरणी फारुख खान, विक्रम पाटील, देवेंद्र सूर्यवंशी आणि एका अनोळखीवर गुन्हा नोंद झाला आहे.

मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आकाश मुळेला जुगाराचे व्यसन असून तो गोव्यातील कॅसिनोत नियमित जातो. याठिकाणी फारुखही अनेकदा येत असल्यामुळे दोघांची ओळख आहे. ऑगस्टमध्ये आकाशने कॅसिनोत मोठी रक्कम जिंकली. यापैकी एक लाख रुपयांसाठी फारुखने आकाशला वारंवार फोन करून त्रास दिला. तसेच एक सप्टेंबरला फारूखसह साथीदारांनी आकाशला बिनखांबी गणेश मंदिर परिसरात अडवून त्याला करवीर लॉजमध्ये नेले. मारहाण करून त्याच्याकडील ६० हजार रुपये हिसकावून घेतले. तर उर्वरित ४० हजार रुपये लवकर देण्यास सांगून सोडून दिले.

आकाश १० सप्टेंबरला कराडला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला होता. यावेळी फारुखसह चौघांनी त्याचे जबरदस्ती अपहरण करून गोकुळ शिरगाव येथे नेले. तेथे विवस्त्र करून मारहाण केली. तसेच त्याच्याकडील ३० हजार रुपये हिसकावून घेतले. उर्वरित १० हजार रुपये दिले नाही तर विवस्त्र केलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. १९ सप्टेंबरला हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अखेर मुळे याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT