राशिवडे : येथील यासिन नजिर शेख (वय 43) यांचे कारमधून अपहरण करून मारहाण करत रोख रक्कम 24,500, घड्याळासह मोबाईल लंपास केल्याप्रकरणी स्वप्निल श्रीरंग शिंदे (रा. दिंडनेर्ली, ता. करवीर), राजू दत्तात्रय ढवण (रा. नंदगाव, ता. करवीर) या दोघांविरुध्द राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी यासिन शेख व अपहरण करणारे यांची ओळख आहे. राशिवडेतील साई पेट्रोल पंपावर शेख मोटरसायकल घेऊन उभे असता श्रीरंग शिंदे कार (क्र. एमएच 09 - 9997) घेऊन आला. त्याचवेळी अनोळखी इसमांनी शेख यांना गाडीमध्ये उचलुन टाकले व त्यानंतर त्यांच्याकडील 24,500 रू., घड्याळ, मोबाईल काढून घेऊन शिंदे यांच्या घरासमोर सात ते आठ जणांनी काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिंदे याला पोलिसांचा फोन आल्यानंतर शेख यांना सोडून दिले व जर पोलिसांमध्ये तक्रार दिलीस तर घरदार पेटवून सगळ्यांना संपविणार, अशी धमकी दिल्याची तक्रार शेख यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पो. नि. संतोष गोरे करत आहेत.