कोल्हापूर : रुबाबासाठी बेकायदेशीर गावठी पिस्टल कंबरेला लावून फिरणाऱ्या मालकासह कामगाराला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. रामानंदनगर ते निर्माण चौक मार्गावर सापळा रचत ही कारवाई केली.
याप्रकरणी छन्नुसिंह ऊर्फ चिन्मय विलास सरनोबत (वय 34, रा. तुळजाभवानी मंदिर परिसर, सानेगुरुजी, मूळ रा. डवरी गल्ली, तिरपण, ता. पन्हाळा) व अजिंक्य जयसिंग भोसले (वय 28, रा. वेताळ तालीम परिसर, शिवाजी पेठ, मूळ रा. म्हसवे, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, दोन मॅगझीन, 14 राऊंड, मोबाईल आणि दोन मोपेड असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सागर डोंगरे यांना रामानंदनगर ते निर्माण चौक रस्त्यावरील मैलखड्डा येथे मोपेडवरून एकजण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचत भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे पिस्टल छन्नुसिंह याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सानेगुरुजी येथून छन्नुसिंह ऊर्फ चिन्मय विलास सरनोबत याला अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
छन्नुसिंह सरनोबत याचा फर्निचर बनविण्याचा कारखाना आहे. अजिंक्य भोसले छन्नुसिंहच्या कारखान्यामध्ये कामगार आहे. छन्नुसिंहने शनिवारी अजिंक्यकडे तात्पुरत्या स्वरूपात पिस्टल ठेवण्यासाठी दिले होते. तो पिस्टल घेऊन जाताना पोलिसांनी अजिंक्यला अटक केली, तर अजिंक्यने पिस्टल मालकाचे असल्याचे सांगितले. परवाना नसल्यामुळे बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी या कामगार, मालकास पोलिसांनी अटक केली.