नागाव : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप गावच्या पुलाजवळ ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कारचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी प्रमोद संभाजी महाडीक (रा. संभापूर, ता. हातकणंगले) याच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष शंकर राजीगरे (वय ५७, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राजीगरे हे त्यांच्या कारने (क्र. एमएच ०९ जीजे २८८९) प्रवास करत असताना टोप-संभापूर चौकातील कमानीजवळ एक कार (क्र. एमएच ०९ जीए ०८४२) रस्त्याच्या मधोमध थांबलेली होती. ओव्हरटेक करण्यासाठी राजीगरे यांनी हॉर्न वाजविल्यानंतर संबंधित कारमधील व्यक्तींनी खाली उतरून त्यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेचा मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न राजीगरे यांनी केला असता, आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राजीगरे कारमध्ये बसत असताना आरोपींनी कारला लाथा मारून चालकाच्या बाजूच्या दरवाजाचे हँडल तोडून नुकसान केले. यानंतर आरोपींनी कार आणि दुचाकीवरून राजीगरे यांचा पाठलाग केला. टोप पुलाजवळ त्यांच्या कारच्या मागील काचेवर दगड मारून ती फोडण्यात आली.
या मारहाणीत राजीगरे यांच्या छाती, पोट, पाठ तसेच हातापायांना मुका मार लागला आहे. चेहरा आणि नाकाजवळही दुखापत झाली असून डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या कोल्हापुरातील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पांडे करीत आहेत.