टोप : टोप परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, पाटील टेक आणि नारायण टेक परिसरात एकाच रात्री अनेक घरांमध्ये चोरीचे प्रयत्न करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हातात कोयते घेतलेल्या चोरट्यांचा वावर व्हिडिओमध्ये दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे टोपमध्ये कोयता गँगची दहशत निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास पाटील टेक येथे चोरट्यांनी राजन पाटील यांच्या जुन्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व वस्तूंची तपासणी केली; मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणारे विनायक पाटील यांच्या घराला लक्ष्य केले. खिडकीतून मुख्य दरवाजाचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच विनायक पाटील यांना जाग आली. त्यामुळे चोरट्यांनी दरवाजाला बाहेरून कडी लावून घटनास्थळावरून पळ काढला.
याचदरम्यान साई मंदिराजवळील सुहास पाटील यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर रात्री १:४५ वाजण्याच्या सुमारास नारायण टेक येथील प्रवीण सुभाष पाटील याच्या जुन्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्याची नथ घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
या नंतर हे चोरटे महाडिक कॉलनी कडे पसार झाले या संपूर्ण घटनाक्रमात हातात कोयते घेतलेल्या चोरट्यांचा वावर व्हिडिओमध्ये आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. एकाच रात्री अनेक ठिकाणी घरांची कुलपे तोडण्याचे प्रयत्न आणि हातात घातक शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे यामुळे टोप परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी तातडीने या व्हिडिओची तपासणी करून संबंधित चोरट्यांचा शोध घ्यावा, परिसरातील रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा टोळ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.