इचलकरंजी : दुचाकी चोरायची आणि गहाणवट ठेवून पैसे मिळवून गोव्यात कॅसिनोमध्ये उधळायची चटक लागलेल्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी अटक केली. प्रदीप बाळू मस्के (वय २४, रा. तारदाळ) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, मस्के फळ विक्रेता म्हणून वावरायचा.
अल्ताफ सद्दाम सनदी यांची दुचाकी घरासमोरून चोरीला गेली होती. तपास करताना पोलिसांना संशयित मस्के याच्याबाबत माहिती मिळाली. ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. चोरीच्या दुचाकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाणवट ठेवल्या होत्या. मस्के याने शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ७, गावभागच्या हद्दीतून ५, शहापूर आणि कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी १ दुचाकी चोरली आहे.