नागाव; शिये येथील हनुमान नगर येथील चिकन व्यावसायिक फिरोज खानसो मुजावर (वय ४४ रा.महाजन कॉलनी,नागाव) यांचा खून करून मृतदेह शिरोली एमआयडीसी परिसरातील एका विहिरीत टाकला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगरमधून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गावर आर.एफ. चिकन सेंटरच्या माध्यमातून चिकन विक्रीचा व्यवसाय करणारे फिरोज मुजावर हे शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरातून बाहेर पडले होते. मात्र, शनिवारीपर्यंत ते कुठेही दिसून न आल्याने त्यांचा मुलगा फरान मुजावर याने वडील बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत केली होती. त्यानंतर कुटुंबीय आणि मित्रमंडळी गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान, सोमवारी सकाळी शिरोली एमआयडीसीतील मंत्री मेटॅलिक्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या शेतवड परिसरातील एका विहिरीत मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकऱ्यांना आढळून आला. शेतकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
मृताच्या डोक्यावर व पाठीवर जखमा असल्याचे निदर्शनास आल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता फरान मुजावर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये काही नातेवाईकांसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. या वादातून खून झाला असल्याचे उघडकीस आले.
याबाबत पोलिसांना चौकशीअंती त्याच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार केला होता तसेच त्याच्या तोंडात कापडाचा बोळा घालून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह शिरोली एमआयडीसी परिसरातील विहिरींत टाकला होता. या बाबत पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.