बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील शिराळे-वारुण येथील मुख्य गल्लीतील एका बंद घराचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिराळे-वारुण येथील मुख्य गल्लीत वनिता दत्तात्रय शेडगे यांचे घर आहे. गणेशोत्सव साजरा करून त्या २३ सप्टेंबर २०२६ रोजी कुटुंबीयांसह मुंबई येथे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दरम्यान, मंगळवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरात जाऊन पाहिले असता आतील सर्व साहित्य विस्कटलेले होते. तसेच लाकडी कपाट उघडून त्यातील साहित्यही अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवलेली लोखंडी तिजोरी फोडून त्यातील ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याच्या कानातील रिंग व कुड्या, चांदीची नाणी, चांदीची बिस्किटे, इतर चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी वनिता शेडगे यांनी ११ नोव्हेंबर रोजी शाहूवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस उपनिरीक्षक अतुल सोनुने व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. यावेळी तपासासाठी कोल्हापूर येथून फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते.
गाव सोडून बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या बंद घरांना लक्ष्य करून चोऱ्या करण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घरफोडीचा छडा लावून चोरट्यांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान आता शाहूवाडी पोलिसांसमोर उभे राहिले आहे.