पेठवडगाव : बोलत बोलत झालेल्या वादात लाकडी फळी डोक्यात घातल्याने वडगाव येथील संभाजी धर्मा साळुंखे (वय ५०, रा. डवरी वसाहत, पेठवडगाव) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी करण भीमराव जगताप (रा. डवरी गल्ली, यादवनगर, कोल्हापूर)याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पेठवडगाव येथील बाजार समितीकडे जाणाऱ्या रोडलगत डवरी वसाहत आहे. या वसाहतीतील चंद्रकांत शिंदे यांच्या मुलीचा विवाह कोल्हापूर येथील करण जगताप याच्याशी झाला आहे.त्यामुळे करण याचे नेहमी वडगाव येथे येणे जाणे असते.रविवारी करण जगताप हा वडगावला आला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास त्याच्या सासुरवाडी शेजारी राहणाऱ्या संभाजी साळुंखे याच्याबरोबर काही कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी करण जगताप याने रागाच्या भरात जवळच पडलेली लाकडी फळी घेऊन संभाजीच्या डोक्यात मारली. वर्मी मार बसल्याने संभाजी गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला.
तातडीने त्याला उपचारासाठी वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील छ. प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर करण जगताप फरार झाला असुन वडगाव पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. संभाजी हा भंगार गोळा करून विकण्याचे काम करत होता.त्याच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.संभाजी याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी मीना साळुंखे हिने वडगाव पोलिसांत दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे तपास करत आहेत.