चिरीमिरीला सोकावलेल्या फाळकुट गुंडांची दहशत! Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime : चिरीमिरीला सोकावलेल्या फाळकुट गुंडांची दहशत!

जिल्ह्यातील स्थिती; पिस्तुलासह धारदार शस्त्रांचा धाक

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : काळेधंदेवाले, सावकारी टोळ्यांसह अमली पदार्थ तस्करांकडून हप्त्यापोटी मिळणाऱ्या चिरीमिरीला सोकावलेल्या फाळकुट गुंडांनी शहर, उपनगरांसह जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. टोळ्यांची जीवघेणी दहशत गोरगरिबांच्या मुळावर उठू लागली आहे. पिस्तूल, कोयता, एडका यासारख्या प्राणघातक शस्त्रांच्या धाकावर भरदिवसा गुंडागर्दी फोफावत आहे. सीमाभागातील कुख्यात अमली पदार्थ तस्करी टोळ्यांनी कोल्हापूर शहरासह इचलकरंजी परिसरातही नशेचा खुलेआम बाजार मांडला आहे.

आठवड्यापूर्वी पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे; अन्यथा सगळ्यांना पेटवून देण्याची धमकी देत सासनेनगर येथे सराईत टोळीने सोमवारी रात्री दहशत माजविली. नंग्या तलवारी, कोयता, एडक्यासह प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून घराच्या खिडक्यांची तोडफोड केली. महिलांना धमकावले. राजारामपुरी व शाहूपुरी परिसरातही शस्त्रांच्या धाकावर गुंडागर्दीचे एकापाठोपाठ एक प्रकार घडत आहेत. अमली पदार्थ तस्करीमुळे अल्पवयीनही व्यसनाचे बळी ठरत आहेत.

राजकीय आश्रयासह हप्तेगिरीला सोकावलेल्या यंत्रणांकडून होणारी पाठराखण आणि गैरमार्गाने मिळणाऱ्या कमाईमुळे शहर, उपनगरांसह जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या शिरजोर होऊ लागल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या आणि समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कायद्याचा धाक आहे की नाही, अशी स्थिती आहे. दहशतीच्या बळावर गुंडागर्दी, खंडणी वसुली करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईची प्रभावी मात्रा चालणार का, हा प्रश्न आहे.

तस्करांकडून शस्त्रपुरवठा

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पंधरवड्यात गावठी बनावटीची दोन पिस्तुले हस्तगत करून तस्करांना जेरबंद केले आहे. याचाच अर्थ गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुलांसह जीवघेण्या हत्यारांचाही पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर प्रभावी कारवाईची मात्रा लागू केल्याशिवाय बोकाळलेल्या गुन्हेगारीला आळा बसणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT