कोल्हापूर

Pune-Bangalore Highway robbery : पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणीजवळ ट्रॅव्हल्सवर दरोडा; सव्वा कोटींची चांदी लुटली

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी आरामबसवर सोमवारी (दि.22) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून १ कोटी २० लाख रुपये किंमतीची ६० किलो चांदी आणि सोने लंपास करण्यात आले. किणी टोलनाक्यापासून काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला असून, या घटनेमुळे व्यापारी वर्गात आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांचे सोने -चांदी कोल्हापूरहुन मुबंईला अंगडिया सर्व्हिसेसद्वारे नेण्यात येत असते. सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईसाठी अशोका ट्रॅव्हल्सची बस रवाना झाली. या बसमध्ये आधीच तिघे संशयित प्रवासी म्हणून बसले होते. बस किणी टोलनाक्याच्या परिसरात पोहोचताच, बसमध्ये बसलेल्या तिघांपैकी एकाने चालकाच्या गळ्याला चाकू लावला आणि गाडी थांबवण्यास भाग पाडले. बस थांबताच मागून आलेल्या एका कारमधून दरोडेखोरांचे इतर साथीदार तिथे पोहोचले. दरोडेखोरांनी बसच्या डिकीतील ६० किलो चांदी (सुमारे १ कोटी २० लाख रुपये), एक तोळा सोने आणि रोख रक्कम असा एकूण सव्वा कोटींचा ऐवज अवघ्या काही मिनिटांत कारमध्ये भरला आणि पसार झाले.

तपासाची चक्रे फिरली

घटनेनंतर चालकाने तत्काळ ट्रॅव्हल्स मालकाला माहिती दिली. यानंतर पेठवडगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरोडेखोर आधीच प्रवासी म्हणून बसमध्ये बसले असल्याने, या गुन्ह्यात रेकी झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT