कोल्हापूर : जुन्या वादातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात नीलेश किसन आकाडे (वय २४, रा.सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, विचारे माळ, कोल्हापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला. नागाळा पार्क येथील कमानीजवळ ही घटना घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघा हल्लेखोरांना सोमवारी अटक केली.
संशयित ओम अजित लोखंडे, नंदप्रेम लोखंडे, केदार लोखंडे (रा. सदर बाजार, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, नीलेश आकाडे व संशयित ओम लोखंडेसह साथीदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नीलेश हा मित्र रूपेश मिसाळ याच्यासमवेत नागाळा पार्क येथील स्वागत कमानीजवळ रविवारी सायंकाळी डिजिटल बोर्ड लावत होता. त्यावेळी संशयित दाखल झाले.
जुन्या वादातून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. ओम लोखंडेसह त्याच्या साथीदारांनी नीलेश आकाडे याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण केली. ओम लोखंडे याने नीलेशला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर कोयत्याने वार केले. धारदार शस्त्राच्या हल्ल्यात नीलेश गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळला. त्यास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरा ओम लोखंडेसह तिघाविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथकाने हल्लेखोरांना अटक केली आहे.