कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भातील पोलिस यंत्रणांना उघड आव्हान देणाऱ्या आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने शेकडो महिलांना हिसडा मारून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
म्होरक्या वैभव आडोळे मूळचा अमरावती जिल्ह्यातील. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सराईत लहानपणापासून चैनीखोर... अमरावती जिल्ह्यातील अनेक शहरांत त्याने चेनस्नॅचिंगचे गुन्हे केले. पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. अनेक गुन्ह्यांचा छडा लागला. जामिनावर सुटल्यानंतर त्याचे कारनामे सुरूच राहिले. त्याने अकोला, वर्धा, नागपूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्ह्यात चोरीचे गुन्हे केले. पुण्यासह कोकणातही त्याचा शिरकाव झाला.
साठपेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेला वैभव आडाळे औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहातून दि. ४ एप्रिलला जामिनावर सुटला. त्यानंतर त्याने थेट कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणात एंट्री केली. कोल्हापुरात पाटोळेवाडी (कदमवाडी), रंकाळा टॉवर येथील चेनस्नॅचिंग करून साथीदारासमवेत पुण्याला पोहोचला.
कटाक्षाने तो मोबाईलचा वापर टाळत, विना क्रमाकांची दुचाकी, तरीही पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक संतोष गळवे, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, सागर माने, महेश पाटील यांच्यासह पथकाने म्होरक्यासह साथीदाराचा छडा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गुन्ह्यांचा छडा शक्य असल्याचे सुशांत चव्हाण यांनी सांगितले.