gutkha seized: प्रतिबंधित गुटखा जप्त Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime : गुटखा तस्करांचा वाढला धोका; टोळ्यांना कधी लागणार ‘मोका’?

अडीच वर्षांत २३१ जणांना बेड्या : छापेमारी सुरू, तरीही परप्रांतीय टोळ्यांची घुसखोरी

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : नशामुक्त अभियानांतर्गत गुटखा, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध शहर-जिल्ह्यात छापेमारीचे सत्र सुरू असतानाही स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून परप्रांतीय गुटखा तस्करांची घुसखोरी सुरूच आहे. २०२४, २०२५ तसेच ३१ मे २०२६ काळात कोल्हापूर पोलिसांनी २३१ तस्करांना बेड्या ठोकून ५ कोटी ६० लाखांचा गुटखा हस्तगत केला आहे. त्यात काही संघटित टोळ्यांचा समावेश आहे. राजकीय आश्रय आणि कमाईतून मालामाल झालेल्या तस्करांवर ‘मोकां’तर्गत कारवाई होणार का, हा सामान्यांचा सवाल आहे.

कर्नाटक, गोव्यात निर्मिती झालेल्या आणि आरोग्याला घातक ठरलेल्या गुटख्याची शिरोळ, इचलकरंजीसह कागल परिसरातून खुलेआम तस्करी होत असतानाही अन्‍न व औषध प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दोन-चार टपऱ्यांवर कारवाई करून छापेमारीचा आव आणत यंत्रणा स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. कोल्हापूर पोलिसांनी अडीच वर्षांत गुटखा तस्करीचे २६६ गुन्हे दाखल करून स्थानिक, परप्रांतीय तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. गुटखा तस्करांवर ‘मोकां’तर्गत कारवाईचा अध्यादेश नुकताच जारी होऊनही तस्करीचा फंडा फाॅर्मात आहे.

गडगंज झालेल्या आणि गुन्हेगारीला आर्थिक बळ देणाऱ्या तस्करी टोळ्यांवर नव्या अध्यादेशानुसार ‘मोकां’तर्गत कारवाईचा बडगा उगारला जाणार का, हा प्रश्न आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या तस्करीविरोधातील सूचनांचा स्थानिकस्तरावर कितपत अंमल होतो, यावरच कारवाईची तीव्रता ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT