मुरगूड : ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून, तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल आठ महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात चार नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांनाही अटक केली आहे.
आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर, ता. राधानगरी), प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी), विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) अशी नावे आहेत.
पीडित तरुणीची ओळख आदित्य शेटके याच्याशी झाली होती. आदित्यने तिला ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने मुदाळतिट्टा येथे बोलावून मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेऊन तिचे फोटो काढले. हे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची व बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार केला.
यानंतर आदित्यने तरुणीची ओळख रणजित मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजितनेही विविध लॉजमध्ये नेऊन अत्याचार केले. त्यानंतर या नराधमांनी तरुणीची ओळख प्रणवगिरी पालकर याच्याशी करून दिली. त्याने तिला कारमधून लॉजवर नेऊन अत्याचार केला. यानंतर विक्रम पाटील यानेही पाचगाव येथील लॉजवर नेऊन अत्याचार केले.
घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिसप्रमुख निलोत्पल यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला भेट दिली व तपासाबाबत आदेश दिले. अधिक तपास मुरगूड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत.
पैशांची मागणी करून मानसिक छळ
गेल्या आठ महिन्यांपासून हा क्रूर प्रकार सुरू होता. अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी संशयितांनी पीडितेकडे पैशांची मागणी केली होती. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडीओ डिलीट न करण्याची धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरूच ठेवला. अखेर हा असह्य त्रास सहन न झाल्याने पीडितेने मंगळवारी तक्रार दिली.