दिलीप भिसे
कोल्हापूर : टोळी युद्धातून जवाहरनगर, राजेंद्रनगर येथील तरुणांच्या जमावाने टिंबर मार्केट, गंजीमाळ परिसरात धुडगूस घालून पंचवीसवर वाहनांची तोडफोड, घरांवर दगडफेक करून दहशत माजविली. म्होरक्यासह साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी पंधरवड्यानंतरही गंजीमाळ परिसरात गावगुंडांच्या दहशतीची अजूनही धास्ती आहे. मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांसह स्टॉलधारक, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांत असुरक्षिततेची भावना आहे.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निष्पाप वाहनधारकांना आर्थिक झळ सोसावी लागली आहे. छोट्या-छोट्या टपऱ्यांसह हातगाडीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दगडफेकीत गोरगरिबांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घटनेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नाही, अशा मंडळींना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
गांजा पार्टी अन् म्होरक्यांचे वाढदिवस
सराईत गुंडांसह नशेखोरांचा वावर वाढल्याने मध्यवर्ती चौकात दोन वर्षांपूर्वी अद्ययावत (?) सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. देखभालीअभावी कॅमेरे नुसतेच उभे आहेत. कॅमेऱ्याखाली चौकात मध्यरात्रीला टोळक्यांचे वाढदिवस, फटाक्यांचे बार, म्होरक्यांचा जयंघोष, शेजारील झाडीत गांजा पार्टी, सायलेन्सर काढलेल्या दुचाकींची रॅली... एक ना अनेक प्रकार; मात्र जुना राजवाडा पोलिसांना त्याचं काही एक देणं-घेणं नाही. मध्यवर्ती चौकात तुफान राडा होऊनही पोलिसांच्या गस्ती पथकांचं नागरिकांना दर्शन नाही.
गांजा तस्करीचा फिरता बाजार...
टिंबर मार्केट परिसरात सायंकाळनंतर गांजा तस्करांचा अजूनही फिरता बाजार चालतो. सामान्य नागरिक उघड्या डोळ्याने उलाढाली पाहताे आहे; मात्र समाजकंटकांच्या दहशतीमुळे कोणीही बोलत नाही. त्याचाच गैरफायदा समाजकंटक उठवित आहेत. राजाराम चौकात रात्र-दिवस गस्ती पथकाची मागणी असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींसह पोलिस यंत्रणेकडून डोळेझाक होत असल्याची नागरिकांची भावना आहे.