कोल्हापूर

कोल्हापूर : टोळीयुद्ध भडकले; पाठलाग करत गुंडाचा खून

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : टोळीयुद्धातून पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तलवार, एडक्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. टिंबर मार्केट ते जोशीनगर झोपडपट्टी रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ शहाजी वसाहत येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. सुजल बाबासो कांबळे (19, रा. वारे वसाहत) असे मृताचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून 10 ते 12 जणांनी पाठलाग करून हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेमुळे वारे वकोल्हापूर : टोळीयुद्ध भडकले; पाठलाग करत गुंडाचा खूनसाहत, संभाजीनगर परिसरात खळबळ उडाली. सुजलचे मित्र व नातेवाईकांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी विरोधी टोळीतील गुन्हेगार तरुणांची धरपकड सुरू केली असून चार ते पाचजण ताब्यात घेतल्याचे समजते. सोशल मीडियावर रिल्सचे व्हिडीओ तयार करून त्यातून आव्हाने-प्रतिआव्हाने दिल्याच्या रागातूनही खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी पोलिसांकडून आणि सीपीआरमध्ये मिळालेली माहिती अशी : सुजल कांबळे हा तेजस कदम (रा. जवाहरनगर), रोहित जाधव, अभिषेक जाधव (दोघेही रा. गंजीमाळ), जोतिबा बोंगाणे (रा. कणेरीवाडी), संतोष कुदळे (रा. नंगीवली चौक) यांच्यासोबत टिंबर मार्केट ते जोशीनगर झोपडपट्टी रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळील रिक्षा स्टॉपच्या बाकड्यावर बसले होते. दुपारी 12.30 वा. सुमारे दहा ते बारा हल्लेखोर मोटारसायकलींवरून आले. तलवारी, एडका व इतर शस्त्रे त्यांच्या हातात होती. सशस्त्र हल्लेखोरांची संख्या जास्त असल्याने सुजल याच्यासह त्याचे मित्र रस्ता दिसेल तिकडे पळत सुटले.

सपासप वार झाल्याने तडफडत कोसळला

सुजल हा टिंबर मार्केटच्या दिशेने पळत सुटला. मात्र हल्लेखोरांनी घेरून त्याच्यावर तलवारीसह इतर धारदार हत्यारांनी सपासप वार केले. रोहित जाधव कसाबसा हल्लेखोरांच्या तावडीतून सुटून पळाला. हल्ला झाल्यानंतर सुजल सुमारे 50 मीटरपर्यंत पळत जीव वाचविण्यासाठी धडपडत पळत होता. पाठलाग करत हल्लेखोरांनी सुजलच्या पाठीत, पोटावर, हातावर, खांद्यावर सपासप वार केले. या कालावधीत तीन वेळा तो रस्त्यावर कोसळला. तरीही हल्लेखोर त्याच्यावर तुटून पडले होते. सुजल निपचित पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत दुपारी 12.39 वाजता सुजलने अभिषेकला फोन करून हल्ला झाल्याचे सांगितले.

दुचाकीवरून सीपीआरमध्ये आणले

संतोष कुदळे व अभिषेक जाधव घटनास्थळी आले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. त्या दोघांनी सुजलला दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवून थेट सीपीआरमध्ये आणले. त्याच्या मित्रांचेही कपडे रक्ताने माखले होते. संतोषच्या कपड्यावरही सगळीकडे रक्त होते. दरम्यान, सुजलचा वाटेतच मृत्यू झाला. सुजलवर हल्ला झाल्याची माहिती वारे वसाहत आणि संभाजीनगर परिसरात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआरकडे धाव घेतली. सीपीआरचा अपघात विभाग आणि परिसरात गर्दी झाली होती. खबरदारी म्हणून तत्काळ पोलिसांनी या ठिकाणी हत्यारधारी पोलिस नियुक्त करून बंदोबस्त वाढविला. खुनासंदर्भात अजय किरण तांबे (25, रा. वारे वसाहत) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंदविण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT