file photo  
कोल्हापूर

अल्पवयीन मुलीकडून 51 तोळे दागिने लुबाडले

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एडीट केलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शहरातील एका अल्पवयीन मुलीकडून परप्रांतीय तरुणाने तब्बल 51.4 तोळे सोन्याच्या दागिन्यांची लुबाडणूक केली. त्याची किंमत 25 लाख 95 हजार रु. आहे. परप्रांतीयाने संबंधित मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून हे कृत्य केले.

याबाबत मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 19 एप्रिल ते 25 मे या कालावधीत ही घटना घडली. संबंधित मुलगी ताराबाई पार्कातील एका व्यावसायिकाची असून परप्रांतीयाचे नाव बनीदास (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

पोलिसांनी सांगितले की, संबंधित मुलीची इन्स्टाग्रामवर बनीदास नावाच्या तरुणाबरोबर ओळख झाली. स्नॅपचॅट व व्हॉटस् अ‍ॅपवर त्यांचे चॅटिंग सुरू झाले. तरुणाने अल्पवयीन मुलीला फोनवरून संपर्क करायला सुरुवात केली. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन संबंधित तरुणाने त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनंतर त्याने मुलीला आपण खूप आर्थिक अडचणीत असल्याचे भासविले. त्याच्या आधारे तिला भावनिक ब्लॅकमेल करून पैशांची आणि दागिन्यांची मागणी केली. न्यू शाहूपुरी परिसरातील सासने ग्राऊंड आणि नागाळा पार्कातील रेसिडेन्सी क्लब येथे भेटून तिच्याकडून दागिने घेतले. त्याबरोबरच तिच्यासोबत फोटो काढले.

मुलीने त्या परप्रांतीय तरुणाला पहिल्यांदा 15 तोळ्यांचा नेकलेस दिला. त्यानंतर त्याने आणखी दागिन्यांची मागणी केली. त्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. दागिने न दिल्यास फोटो आणि व्हिडीओ एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली. आपली आणि कुटुंबीयांची बदनामी होईल, या भीतीपोटी तिने घरातील आणखी 26 तोळे दागिने त्या परप्रांतीय तरुणाला दिले. त्यानंतरही त्या तरुणाने तिला लुबाडण्यासाठी भीती घातली. आणखी दागिने आणि पैशाची मागणी केली.

अखेर वैतागलेल्या मुलीने कुटुंबीयांना ही घटना सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्या परप्रांतीय तरुणाविरुद्ध शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बनीदास या तरुणाच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे.

मुलीच्या पालकांना धक्का

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा अशाप्रकारे मानसिक छळ झाल्याचे ऐकून पालकांना धक्काच बसला. मुलीने हकिकत सांगितल्यानंतर पालकांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही मुलीकडून माहिती जाणून घेतल्यानंतर त्या परप्रांतीयाचा शोध घेण्यासाठी सूत्रे फिरविली. पथके रवाना केली. त्यासाठी सायबर क्राईम सेलचीही मदत घेतली जात आहे.

लुबाडणूक केलेले दागिने व कंसात किंमत

* 15 तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस (7 लाख 50 हजार रु.)
* डायमंडची कानातील रिंग (25 हजार रु.)
* सहा तोळ्यांच्या सोन्याच्या सहा बांगड्या (3 लाख रु.)
* दोन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट (1 लाख रु.)
* दोन तोळ्यांची एक व एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन (2 लाख रु.)
* चार तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस (2 लाख रु.)
* अडीच तोळे सोन्याच्या कानातील पाच जोड्या रिंग ( 1 लाख 25 हजार रु.)
* 15 तोळे वजनाचा नेकलेस व कानातील रिंग जोडी (7 लाख 50 हजार रु.)
* नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची 9 नाणी (45 हजार रु.)
* तीन तोळ्यांचे सोन्याच्या मंगळसूत्रातील पेंडेंट (1 लाख 50 हजार रु.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT