कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रंकाळा टॉवर येथील भरचौकात झालेल्या अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (वय 25, रा. डवरी वसाहत, यादवनगर) याच्या खूनप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मुख्य सूत्रधार रोहित अर्जुन शिंदे याच्यासह 8 जणांना शुक्रवारी बेड्या ठोकल्या. रोहित शिंदेसह राज जगताप, आकाश माळी, सचिन माळी, नीलेश माळी, गणेश माळी, प्रशांत शिंदे, नीलेश बाबर यांनी यादवनगरसह डवरी वसाहत परिसरातील वर्चस्व आणि खुन्नस देण्याच्या वृत्तीला कंटाळून अजय शिंदे याची संगनमताने गेम केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. स्वत:ला रावण टोळीचा म्होरक्या समजणारा अजय शिंदे सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे.
यादवनगरसह डवरी वसाहत परिसरात त्याची दहशत होती. खुनातील संशयित हे अजय शिंदे याचे नातलग आहेत. डवरी वसाहतमधील तरुणांनी रावण टोळीत सक्रिय राहून दहशत वाढवावी, यासाठी त्याचे प्रयत्न होते; मात्र सतत शिवीगाळ, मारहाण करण्याशिवाय खुन्नस देण्यामुळे रावण टोळीतील काही साथीदार अजय शिंदेपासून चार हात दूर झाले होते.
रोहित शिंदेने शिजवला हल्ल्याचा कट
दोन दिवसांपूर्वी मुख्य संशयित रोहित शिंदेला चौकात त्याची दुचाकी अडवून 'तुझी गेम करेन,' अशी अजयने धमकी दिल्याने सारे सावध झाले होते. आपली गेम होण्यापूर्वी अजय शिंदे याचाच कायमचा काटा काढण्यासाठी अन्य साथीदारांच्या मदतीने रोहितने कट रचला. रोहितसह त्याच्या साथीदारांनी गुरुवारी सायंकाळी अजय शिंदे याच्याशी संपर्क साधून वाद मिटवून पुन्हा एकत्र येऊया, असे त्याला सांगितले. अजय शिंदे रंकाळा टॉवर परिसरात पोहोताच त्याच्यावर हल्ला केला. मारेकर्यांनी हातांवर गोंदवून घेतले रावण गँग सर्व संशयित महिन्यापूर्वी रावण टोळीचे साथीदार होते; मात्र अजय शिंदे याच्या कारनाम्यांमुळे त्याच्यापासून ते दूर झाले होते. अटक केलेल्या दोघांनी हातावर रावण गँग असे गोंदवल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार कळमकर, निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह संयु्क्त पथकाने शिंदे खुनातील 7 जणांना इस्पुर्ली येथून व नीलेश बाबरला सायबर चौकातून ताब्यात घेतले.
सीपीआरमध्ये कुटुंबीय, नातेवाईकांचा आक्रोश
मारेकर्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या अजय शिंदे याच्या मृतदेहाची शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईकांनी आक्रोश केला. खबरदारीचा उपाय म्हणून सीपीआर आवारासह डवरी वसाहत, यादवनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
धारदार शस्त्रांमुळे शरीराची चाळण
जुन्या मित्रांच्या शब्दावर विश्वास ठेवून अजय शिंदे रंकाळा टॉवर परिसरात पोहोताच शस्त्रांनिशी सज्ज असलेल्या संशयितांनी त्याच्यावर झडप घालून हल्ला केला. धारदार शस्त्रांमुळे शरीराची चाळण झाली. अतिरक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. याबाबतची कबुलीही मारेकर्यांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी सांगितले.
खुन्नसमुळे रावण टोळीत पडली फूट
पंधरवड्यापूर्वी अजयने नात्यातील तरुणाला मारहाण केली, तर दुसर्या साथीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने संशयितांनी त्याची गेम करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. रावण टोळीत उघड-उघड दोन गट पडले होते, तरीही डवरी वसाहत परिसरातील वर्चस्वासाठी अजय शिंदे याची धडपड सुरू होती. खुन्नसपणामुळे रावण टोळीत फूट पडली.