कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यात बिंदू चौकातील जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या परप्रांतीय चोरट्याने कारागृहाच्या संरक्षक तटावरून उडी टाकून धूम ठोकल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. धनराज कुमार (वय 30, रा. बैजू मांझी, महम्मदपूर, बेला सारंग, बिहार) असे त्याचे नाव आहे. चोरट्याच्या शोधासाठी शहर, जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्याचा छडा लागला नव्हता.
धनराज कुमारने शहरासह जिल्ह्यात घरफोडी, चोरीचे गुन्हे करून धुमाकूळ घातला होता. शाहूपुरी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडून मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले होते. सोमवारी (दि. 23) न्यायालयीन कोठडीचा आदेश झाल्यानंतर बिंदू चौक येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.
शुक्रवारी सकाळी 8 वाजता सर्वच कैद्यांना बरॅकमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी धनराज कुमारने सुरक्षारक्षकाची नजर चुकवून कारागृहातील पूर्व बाजूस असलेल्या संरक्षक तटावर चढून तेथून उडी टाकली. चोरटा पसार झाल्याचे समजताच शहरातील चारही पोलिस ठाण्यांच्या अधिकार्यांसह पोलिसांनी शोधमोहीम राबविली. नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र सुगावा लागला नव्हता. जेल कर्मचारी सुनील चावरे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे.