आरोपी आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रणवगीरी पालकर, विक्रम बुजवडे 
कोल्हापूर

Kolhapur Crime | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर चौघांकडून आठ महिने अत्याचार, मुरगूड पोलिसांत गुन्हा!

चौघा तरुणांना अटक ! राधानगरी तालुक्याला काळीमा फासणारी घटना

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात चौघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी तालुक्यातील एका पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्याशी ओळख झाली . त्याने तीला ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले व नंतर मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेले. तेथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

बदनामीची भीती दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपीने तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. फिर्यादीनुसार, रणजितने तरुणीला गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यावेळी तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपींनी तरुणीची ओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्यानेही या तरुणीला स्नॅपचॅटवर बोलण्यास भाग पाडले व स्वतःच्या कारमधून घेऊन जाऊन एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) याच्याशीही ओळख वाढवून देण्यात आली. त्याने पाचगाव येथील अशोकाराज लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, वेळोवेळी पीडितेवर अत्याचार करण्यात आले. तसेच प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट केले जाणार नसल्याची धमकी देऊन पीडितेचा शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला.

गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अखेर हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने मुरगूड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि २ जून )तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून मुरगूड पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता जिल्हा पोलीसप्रमुख निलोत्पल यांनी मुरगूड पोलीस ठाण्यास भेट देत तपासासंबंधी आदेश दिले त्यानंतर पीडीतेवर अन्याय करणाऱ्या चौघा तरुणांना शिताफीने अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत .

राधानगरी तालुक्यात खळबळ !

राधानगरी तालुक्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे . याप्रकरणातील आरोपी प्रणावगिरी पालकर याचे कुटुंबीय हे शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित आहेत. त्यांच्या मुलाने अशा प्रकारे केलेल्या प्रतापाबद्दल संताप व्यक्त होत आहे. त्याचबरोबर हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT