कोल्हापूर

Kolhapur Crime : ड्रग्ज तस्करीचे आंतरराज्यीय रॅकेट उघडकीस! इचलकरंजीतील दोघे जेरबंद; निपाणी कनेक्शन समोर, शस्त्रसाठ्यासह MD जप्त

वडगाव पोलिसांची नवे चावरे येथे मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : नवे चावरे ते जुने चावरे मार्गावर वडगाव पोलिसांनी सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज, गांजा, गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि नंबरप्लेट नसलेली कार असा एकूण २४ लाख ५४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत इचलकरंजीतील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या निपाणी येथील एकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २४) करण्यात आली.

गणेश सुरेश आडेकर (वय २९, रा. गणेशनगर, इचलकरंजी) आणि साद मुनीर मुल्ला (वय २२, रा. शिवाजीनगर, कोरोची, इचलकरंजी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर शंतनू चौगुले (रा. बेळगाव रोड, निपाणी, कर्नाटक) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या विनाक्रमांक कारमधून दोघेजण नवे चावरे परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वडगाव पोलिसांनी नवे चावरे ते जुने चावरे रस्त्यावरील एका दवाखान्याच्या फलकाजवळ सापळा रचला. संशयितांची कार येताच पोलिसांनी ती अडवून पंचांसमक्ष झडती घेतली. या झडतीत अमली पदार्थांसह शस्त्रसाठा आणि इतर साहित्य आढळून आले.

१०३ ग्रॅम एम.डी. ड्रग्जसह शस्त्रसाठा हस्तगत

या कारवाईत सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९५ ग्रॅम आणि २४ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम, असे एकूण १०३ ग्रॅम एम.डी. पावडरसदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याशिवाय १० ग्रॅम हिरवट गांजा, ५० हजार रुपये किमतीचे मॅगझिनसह देशी बनावटीचे पिस्तूल आणि ४ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

तसेच २० लाख रुपये किमतीची एम.जी. हेक्टर कार, पाच मोबाईल संच, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, रोख रक्कम, अमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या नळ्या, भांडी, लायटर आणि चिलीम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहनाला नंबरप्लेट नसली, तरी कारच्या डिक्कीत एमएच-०९-जीजे-१०३६ क्रमांकाची नंबरप्लेट आढळून आली.

निपाणीतून ड्रग्जची तस्करी?

प्राथमिक चौकशीत संशयितांनी हे अमली पदार्थ निपाणी येथील शंतनू चौगुले याच्याकडून वेळोवेळी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल धुळाप्पा अष्टेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) आणि शस्त्र कायद्यान्वये (आर्म्स ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पोवार, समीर हिले, खालीक इनामदार, सहायक फौजदार आबासो गुंडणके तसेच अंमलदार श्रीकांत दाभोळकर, इंद्रजीत शिंदे, प्रकाश कांबळे, शरद मेनकर, नितीन जाधव, नितीन पाटील, महेश गायकवाड, शेखर कदम आणि अनिल अष्टेकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT