कोल्हापूर गु्न्हेगारी Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : खून, बलात्कार घटनांनी लौकिकाला धक्का

वर्षात 62 खून अपघातांत 363 बळी जिल्ह्यात सामाजिक सलोखा जपण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनगरीसह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे व्यक्तिगत संघर्ष, पूर्ववैमनस्य, चारित्र्याच्या संशयासह प्रेमायण अन् मालमत्ता अथवा तत्कालीन कारणातूनही जिल्ह्यात संघर्षाचा भडका होऊ लागला आहे. सरत्या वर्षात अशाच कारणांतून तब्बल 62 मुडदे पडले. 2023 वर्षाच्या तुलनेत यंदा त्यात 14 खुनांची भर पडली. बलात्कार 179, विनयभंग 313 घटना जिल्ह्याच्या लौकिकाला मारक ठरणार्‍या आहेत. अशावेळी जिल्ह्यात सामाजिक सलोख्याची परंपरा जपण्याची गरज निर्माण झाली आहे.

वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यांतील कारणेही समाजाच्या चिंता वाढविणार्‍या आहेत. चारित्र्याचा संशय, प्रेमप्रकरणातून 11, आर्थिक देवाण-घेवाण 9, पूर्ववैमनस्य 10, तत्कालीन कारण 12, गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्व वादातून 2 तर अन्य कारणांतून खुनाच्या 10 घटना घडल्या आहेत. बहुतांशी खुनाच्या गुन्ह्यांतील संशयित मारेकरी हे 17 ते 30 वयोगटातील तरुण असल्याचे पोलिस अधिकार्‍यांचा निष्कर्ष आहे.

सरत्या वर्षात 2 हजार 407 गुन्ह्यांची घट

2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भाग 1 ते 5 सदरांतर्गत एकूण 5 हजार 490 गुन्हे शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. 2023 वर्षाच्या तुलनेत 2 हजार 407 गुन्ह्यांची घट दिसून येते. ही घट प्रामुख्याने ठकबाजी 1150, खुनाचा प्रयत्न 13, चोरी 497, घरफोडी 58, जबरी चोरी 49, गर्दी- मारामारी 158, विनयभंग 101, दुखापत 205, प्राणघातक अपघात 26 अशा गुन्ह्यांत झाली आहे. तर भाग 6 सदरांतर्गत 8 हजार 216 गुन्हे दाखल झाले आहेत. 2023 वर्षाच्या तुलनेत 2890 गुन्ह्यांची वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने दारूबंदी 1168, जुगार 96, अमली पदार्थ तस्करी, गुटखा, मोटार वाहनांचा समावेश असल्याचे दिसून येते.

दीड हजारावर जुगार्‍यांच्या मुसक्या! 5 कोटींचा दारूसाठा जप्त

गोवा बनावट दारू तस्कराविरुद्ध जिल्ह्यात प्रभावी कारवाईची मात्रा लागू करण्यात आली होती. 1 जानेवारी ते 28 डिसेंबर 2024 याकाळात 3 हजार 467 तस्करांवर शहरासह जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले. सुमारे 5 कोटी 8 लाख 30 हजारांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे. तर काळेधंदेवाल्याविरुद्ध 1 हजार 472 गुन्हे दाखल करण्यात आले. 1 कोटी 51 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अमली तस्करीप्रकरणी 112 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 86 लाख 62 हजारांचा अमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

7 हजार 269 अर्जांचे निर्गतीकरण !

शहरासह जिल्ह्यातून विविध तक्रारी व अडचणींच्या अनुषंगाने 2024 मध्ये जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसह पोलिस नियंत्रण कक्षांकडे एकूण 8 हजार 44 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 7 हजार 269 अर्जांची निर्गती करण्यात आली आहे. 775 अर्ज चौकशीवर प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.

1200 तळीरामांवर कायद्याचा बडगा !

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये जिल्ह्यात धक्कादायक वाढ झाल्याचे दिसून येते. 2024 मध्ये ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हमध्ये 1204 तळीरामांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या 452 वाहनधारकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेदरकारपणे वाहने हाकणार्‍या 753 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भादवि कलम 188 अन्वये 45 जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

अपघातांचे दोन वर्षांत 752 बळी

शहरासह जिल्ह्यात दोन वर्षांत अपघाती घटनांचे प्रमाण धक्कादायकपणे वाढले आहे. परिणामी, अपघातांच्या भीषण घटनांमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. 2023 मध्ये अपघातांमुळे 389 जणांचे, तर 2024 मध्ये 363 निष्पापांचे बळी गेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत प्राणघातक अपघातांच्या घटनामध्ये 26 ने घट झाली आहे. चालकाचा बेदरकार, निष्काळजीपणामुळेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा वरिष्ठाधिकार्‍यांचा निष्कर्ष आहे. दोन वर्षांत तब्बल 752 निष्पाप रस्त्यावरील अपघातांचे बळी ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT