इंद्रजित शिंदे
पन्हाळा : पन्हाळा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडक कामगिरी करत वाघवे (सुर्वेवाडी) येथून बोकड चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि बोकड विकून आलेली रोख रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाघवे येथील सुर्वेवाडी डोंगरमाळरानात फिर्यादी आपल्या शेळ्या व बोकड चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत फिर्यादींची नजर चुकवून बोकड पळवून नेले. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निंगाप्पा चौखंडे यांनी स्वतंत्र तपास पथक गठीत केले. पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करून संशयित दुचाकीचा (क्रमांक MH 51 G 6941) माग काढला.
सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी रमजान महंमद गडकरी (वय २८) आणि रोहित राजेंद्र कार्वेकर (वय ३२, दोघे रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांकडून चोरीसाठी वापरलेली ७० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल आणि बोकड कापून विकून मिळालेले ३५ हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहायक फौजदार मारुती नाईक, पोलिस अंमलदार तौसिफ मुल्ला, दिगंबर चिले, अरुण पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र कांबळे व समीर मुल्ला यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार मारुती नाईक करत आहेत.