गडहिंग्लज : निलजी (ता गडहिंग्लज) येथील एका 23 वर्षीय युवतीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपींना गडहिंग्लज पोलिसांनी पकडले.
सदर मुलीने दिलेल्या फिर्यादीत इजाज मजीद शेख (रा. हेरे, ता. चंदगड,) रमिजा, तनविर, आसीफ व एक अनोळखी महिला या पाच जणांनी निलजीतील दर्गासमोरील रस्त्यावर कारमधून तिचे अपहरण केले. तिला बेळगावच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्यात गाडी बंद पडल्याने बेळगाव येथील आत्याच्या घरी नेले. दरम्यान, सदर पीडिता शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरड केली. यावेळी आत्याने तिला मदत करत नातेवाईकांशी संपर्क केला.
याच दरम्यान अपहरणाची माहिती कळताच गडहिंग्लज पोलिस तपासासाठी बेळगावच्या दिशेने जात असताना त्यांना ती मुलगी आत्याकडे असल्याचे कळाले. त्या ठिकाणी जाऊन मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले व यातील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.