इचलकरंजी : वस्त्रनगरी इचलकरंजी बुधवारी (दि. ४) दुपारी गोळीबाराच्या आवाजाने हादरून गेली. पूर्ववैमनस्यातून सांगलीवाडी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार ओंकार कांबळे याच्यावर इचलकरंजीतील एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे, ही खळबळजनक घटना पोलिसांच्या डोळ्यांदेखत घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमी ओंकार कांबळे आणि हल्लेखोर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. याच पूर्ववैमनस्यातून आज इचलकरंजीमध्ये दोघांचा सामना झाला. वाद विकोपाला गेल्याने संशयित आरोपीने आपली बंदूक काढून पोलिसांच्या उपस्थितीतच ओंकारवर गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.
या भीषण हल्ल्यात ओंकार कांबळे गंभीर जखमी झाला असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते.
भरवस्तीत आणि पोलिसांसमोर झालेल्या या धाडसी गोळीबारामुळे इचलकरंजी पोलीस दलाची मोठी धावपळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.