कोल्हापूर : गांजा आणि मद्यप्राशनानंतर सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून सख्ख्या भावाचा स्टेनलेस स्टीलच्या बाटलीने डोक्यात प्रहार करून अमानुष खून केल्याची घटना राजारामपुरी मातंग वसाहतीत रविवारी सायंकाळी घडली. हर्ष विलास पांढरबळे (23, रा. मातंग वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित यश विलास पांढरबळे (20) हा रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. व्यसनाधीन भावाकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.
रंगपंचमीचा जल्लोष सुरू असतानाच रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे राजारामपुरीसह परिसरात खळबळ उडाली. संशयित यश पांढरबळे स्वत: सायंकाळी साडेसात वाजता राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. मांतग वसाहत येथील राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये स्वत:च्या भावाचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस निरीक्षक सुजित होडगर, सहायक निरीक्षक रणजित पाटील, अधिकारी साळुंखे यांच्यासह फॉरेन्सिक लॅब पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. स्टेनलेस स्टीलच्या बाटलीने डोक्यावर जोरदार प्रहार केल्यामुळे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खुनाची घटना समजली. घटनास्थळासह परिसरात नागरिकांची तोबा गर्दी झाली.
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, विलास पांढरबळे यांना तीन मुले. त्यापैकी हर्ष हा सर्वात मोठा मुलगा तर संशयित यश दोन नंबरचा मुलगा. तिसरा क्रिशचे तामगावला वास्तव्य असते. हर्ष विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहेत. हल्लेखोर यश अविवाहित आहे. दोघेही भाऊ एकत्रित राहतात. हर्षला गांजासह मद्यप्राशनाचे व्यसन आहे. वाढपी म्हणून काम करणारा हर्ष सायंकाळनंतर कायम धुंदीत असायचा. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात किरकोळ कारणातून सतत कुरबुऱ्या होत असत. सतत होणारी मारहाण, शिवीगाळ यामुळे संशयित यश हैराण झाला होता. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता राहत्या घरात हॉलमध्ये दोघांत पुन्हा वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानंतर संतापलेल्या यशने घरातील स्टेनलेस स्टीलच्या बाटलीने हर्षच्या डोक्यावर एकापाठोपाठ अनेक वार केले. स्टीलच्या परातीनेही त्याच्यावर हल्ला चढविला.
डोक्याला वर्मी इजा होऊन हर्ष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दहा ते पंधरा मिनिटांनंतर हर्षची हालचाल थंडावल्यानंतर संशयित तेथून निसटला. त्याने थेट राजारामपुरी पोलिस ठाणे गाठले. पोलिस अधिकारी होडगर यांना गाठून सख्ख्या भावाचा खून केल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा अमानुष खून झाल्याने घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. संशयिताला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून त्यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.