कोल्हापूर

Kolhapur Crime | स्टेटसवर व्हिडिओ ठेवल्याच्या रागातून एकास हॉकी स्टिकने मारहाण; सरपंचाच्या भावासह सात जणांवर गुन्हा

सात जणांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नागाव : टोप ता हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या विकासकामाचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत करून तो स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरून एका युवकास लाथाबुक्यांनी व हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना कासारवाडी फाटा परिसरात घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागेश पिलाजीराव पाटील (वय 39, रा. कासारवाडी फाटा, टोप, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 2 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 2.40 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर ही घटना घडली.

फिर्यादी नागेश पाटील यांनी ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या एका कामाचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करून तो आपल्या स्टेटसवर ठेवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून धनाजी बाबुराव पाटील, भगवान शंकर भोसले, विजय आनंदा भोसले, सुनिल बाबासो काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, युवराज देसाई (कवठेकर) आणि सागर पांडुरंग पाटील (सर्व रा. भोसले खडी, टोप, ता. हातकणंगले) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीस अडविले व प्रथम नागेश पाटील यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्यानंतर आरोपी धनाजी पाटील व सागर पाटील यांनी त्यांच्या हातातील हॉकी स्टिकने फिर्यादीच्या उजव्या पायावर व हातावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच यापुढे असे केल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या मारहाणीत नागेश पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील स्टेटसच्या कारणावरून झालेल्या या मारहाणीची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, संबंधित घटनेमुळे टोप परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT