बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे चोरट्यांनी पोलिस चौकीच्या जवळच धाडसी दुकानफोडी करून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. चक्क पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या सोनार पेठेत मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्याची तीन दुकाने फोडली. सुदैवाने, मौल्यवान दागिने सुरक्षित लॉकर्समध्ये असल्याने चोरट्यांचा मोठा डल्ला मारण्याचा प्रयत्न फसला असला, तरी १ लाख १० हजार रुपयांच्या सोने-चांदीवर त्यांनी डल्ला मारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास पाच अज्ञात चोरटे एका इको गाडीतून बांबवडे येथील सोनार गल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दीपक यादव यांचे 'गणेश ज्वेलर्स', रवींद्र पाटील यांचे 'राधाकृष्ण ज्वेलर्स' आणि निवास बुवा यांचे 'रत्नाई ज्वेलर्स' ही लगत असलेली तीन दुकाने लक्ष केली. चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने या तिन्ही दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला.
दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांचा शोध सुरू केला. मात्र, दुकानदारांनी मोठा साठा तिजोरीत (लॉकर्स) बंद करून ठेवल्याने चोरट्यांना यश आले नाही. तरीही बाहेर असलेल्या दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला. यात गणेश ज्वेलर्समधून ५५ हजारांची चांदी आणि रत्नाई ज्वेलर्समधून ५५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले. चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी चोरट्यांनी तिन्ही दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर (DVR) देखील सोबत नेले.
नेहमीप्रमाणे पहाटे ४ च्या सुमारास गावातील काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यांना सोनार पेठेतील दुकानांची शटर उचकटलेली दिसताच त्यांनी तत्काळ दुकान मालकांना संपर्क साधला. दुकानदारांनी घटनास्थळी धाव घेतली असता चोरीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला.
बांबवडे बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्ता हा अहोरात्र वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. पोलीस चौकीच्या अवघ्या काही फुटांच्या अंतरावर ही धाडसी चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मानपाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.