दिलीप भिसे
कोल्हापूर : शहर, जिल्ह्यात क्षुल्लक कारणातून उद्भवलेल्या संघर्षातही पोलिस रेकॉर्डवरील सराईत टोळ्यांकडून नंग्या तलवारी, धारदार कोयत्यांसह एडका, चाकू, सुऱ्यांचा वापर होऊ लागला आहे. घातक शस्त्रांसह गावठी पिस्तूल, अत्याधुनिक बनावटीच्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून समाजात दहशत माजवली जात असतानाही स्थानिक यंत्रणा ढिम्म आहे.
कोल्हापूर शहरासह उपनगरे, इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाडसह राधानगरी, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज परिसरात सराईत गुन्हेगारांच्या कब्जात जीवघेणी शस्त्रे आढळून येतात. घातक शस्त्रे कोठून येतात, याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ आहेत. मध्य प्रदेशसह बिहार, गोव्यातून मुबलक तस्करी होत असतानाही स्थानिक यंत्रणा डोळ्यांवर पट्टी बांधूनच आहे.
म्होरक्याने किती गुंडांना शस्त्रे पुरवली? : पोलखोलची गरज
कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरीच्या कारनाम्यांचा भांडाफोड करून स्थानिक गुन्हे अन्वेषणने मार्चमध्ये मध्य प्रदेशातील खरगुण जिल्ह्यात छापेमारी करून सरनाम नाहरसिंह बरनाला याला बेड्या ठोकल्या. कुख्यात तस्कराकडून चार गावठी पिस्तुले हस्तगत केली. सरनामसह त्याचे साथीदार दोन वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांसह साथीदारांच्या संपर्कात आहेत. जिल्ह्यातील किती गुंडांना तस्कराने शस्त्रे पुरविली आहेत, याचा भांडाफोड होण्याची गरज आहे. म्होरक्या एकटाच जाळ्यात सापडला आहे, त्याचे साथीदार अजूनही मोकाटच आहेत. साथीदारांचे कनेक्शन शोधल्यास पिलावळीच्या कारनाम्यांचा पर्दाफाश शक्य आहे.
अत्याधुनिक हत्यारांची ऑनलाईन घरपोच सेवा
मध्य प्रदेश, बिहारसह नवी दिल्ली येथील कुख्यात तस्कर शस्त्रे विनासायास घरपोच करण्यासाठी ऑनलाईनचा वापर करीत आहेत. अत्याधुनिक बनावटीची नानाविध हत्यारे गुन्हेगारी टोळ्यांना पोच करण्याची यंत्रणा कार्यरत झाली आहे. विशेषत:, तलवारी, कोयत्यासह एडका, चाकू, सुऱ्यांना ऑनलाईन मागणी असल्याचे चित्र आहे. म्होरक्या सरनाम बरनाला याने यापूर्वी कोल्हापूर, इचलकरंजीसह सीमाभागातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांना शस्त्रे पुरवली आहेत. या गुंडांचा भांडाफोड होण्याची गरज आहे.