Kolhapur Bribe Case  
कोल्हापूर

Kolhapur Bribe Case : वारस व फेरफार नोंदीसाठी २ हजारांची लाच घेताना मोजणीदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयात 'एसीबी'ची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : वारस व फेरफार नोंद करण्यासाठी २ हजाराची लाच मागून ती स्वीकारताना शिरोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदार संजय बापू तेली (वय ५२, रा.आळते, ता.हातकणंगले) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.३०) दुपारी ३ च्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर वारस व फेरफार नोंद करण्यासाठी त्यांनी शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम संशयित आरोपी संजय तेली यांच्याकडे होते. या कामासाठी तेली यांनी तक्रारदाराकडे २ हजाराच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, संजय तेली यांनी फेरफार नोंदीसाठी २ हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने कार्यालयात सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या समक्ष तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेली याला रंगेहाथ अटक करण्यात आली. तेली याच्याविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कोल्हापूर एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस अंमलदार सुधीर पाटील, कृष्णा पाटील, संदीप पवार व रविंद्र पाटील यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT